‘अवकाळी’ सरींमुळे नोकरदारांची त्रेधातिरपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:20 AM2021-01-09T01:20:08+5:302021-01-09T01:20:13+5:30

कल्याण-डोंबिवली : खड्ड्यांमध्ये साचले पाणी; बाजारपेठेत शुकशुकाट

Employees' trepidation due to 'untimely' sari | ‘अवकाळी’ सरींमुळे नोकरदारांची त्रेधातिरपीट

‘अवकाळी’ सरींमुळे नोकरदारांची त्रेधातिरपीट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार पडलेल्या सरींमुळे रस्ते ओले झाले, तर काही ठिकाणी पाणी जमा झाले. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या नोकरदारांची पंचाईत झाली.  


शहर व ग्रामीण भागात दोन दिवसांपासून हवामान ढगाळ होते. त्यामुळे वातावरणातील उष्मा काहीसा वाढला होता. टिटवाळा शहर व ग्रामीण भागांत गुरुवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीत अवकाळी सरी बरसल्या. पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजी, फळेविक्री न झाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यानंतर पावसाने दिवसभर विश्रांती घेतली असली तरी दिवसभर वातावरण ढगाळ होते. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण नव्हते. रेल्वे स्थानक परिसरात सकाळी ११ नंतर काहीसी वर्दळ झाली. मात्र, त्या तुलनेने भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. सकाळी पावसामुळे अनेकांनी रिक्षेने प्रवास करणे पसंत केले.


दरम्यान, शहरात पाण्यामुळे चिखल झाला झाला होता. डांबरी रस्त्यांवर, तसेच खड्यांत पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय झाली होती. तर, वाहनांवर साचलेली धूळ व त्यावर पडलेल्या पावसामुळे वाहने खराब झाली होती. रेल्वे, बस सेवेवर पावसाचा काही परिणाम झाला नव्हता. सर्वत्र सुरळीत वाहतूक सुरू होती. शहरात वीजपुरवठाही सुरळीत सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.


शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस 
भातसानगर : अवकाळी पावसाने गुरुवारी शहापूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी अचानक ढग दाटून आले, तसेच जोरदार वारा आणि पावसाने सगळ्यांची झोपच उडाली. कोरोना, अवकाळी पावामुळे गेलेली भातपीक, बर्ड फ्ल्यू, आता दोन चार दिवसांनी पडणारे ढगाळ हवामान आणि पाऊस, यामुळे तर शेतकरी, व्यावसायिक हताश झाले आहेत. आवरे, कांबारे, साजिवली, बिरवाडी, कुकांबे, शहापूरसह अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.  

उल्हासनगरात रिमझिम सरी
उल्हासनगर : शहरात शुक्रवारी सकाळी रिमझिम सरी कोसळल्या. पावसाने रस्ते निसरडे झाले. पाऊस असल्याने बहुतांश नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळले. सकाळी १०च्या दरम्यान दाट धुके पडले. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
वीटभट्टी व्यावसायिकांना फटका 
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुरबाड : गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने भेंडी, काकडीसह तुरीच्या लागवडीला फटका बसला आहे. वीट व्यावसायिकांच्या कच्च्या विटा भिजून मोठे नुकसान झाले आहे.
आणखी दोन ते चार दिवस असेच वातावरण राहिले तर वीट उद्योगासोबत काकडी, भेंडी, मिरचीसारखी नगदी पिके पूर्णत: वाया जाणार आहेत. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामानंतर दुबार पिके घेण्याकडे वळला आहे. भातपिकाची काढणी झाली की काकडी, भेंडी, सिमला ही जास्तीचा फायदा मिळवून देणारी उत्पादने घेतली जातात. सोबत अनेक शेतकरी भातशेतीच्या बांधावर तुरीची लागवड करू लागलेत. तसेच वीट व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. काकडी, भेंडीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
 

Web Title: Employees' trepidation due to 'untimely' sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.