पाणीपुरवठा विभागातील नोकरभरतीत गैरव्यवहार
By admin | Published: November 10, 2015 02:10 AM2015-11-10T02:10:53+5:302015-11-10T02:10:53+5:30
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ९४ व्हॉल्व्हमॅनच्या भरतीत गैरव्यवहार झाला असून, पालिकेत हंगामी स्वरूपात सात वर्षे काम करणाऱ्यांना मात्र डावलले आहे
ठाणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ९४ व्हॉल्व्हमॅनच्या भरतीत गैरव्यवहार झाला असून, पालिकेत हंगामी स्वरूपात सात वर्षे काम करणाऱ्यांना मात्र डावलले आहे. या निवड यादीत एकाच ठेकेदाराच्या चार उमेदवारांचाही ‘समावेश’ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अनुभवाच्या निकषावर सरळ सेवेने ही पदे भरली आहेत. प्रत्यक्षात ब्रह्मांड जलकुंभावरील संजय पवार, अजय मोरे, भरत वडणे, मोहन मालुसरे आणि गणेश वाशिवले यांच्यासह विजयनगरी जलकुंभावरील बाळाराम पाटील, अनिल तावडे, तुषार खाडे, धनराज पाटील आणि डोंगरीपाडा जलकुंभावरील समीर शेख यांच्यासह अनेक जणांना डावलले आहे. या सर्वांनी २००८ ते २०१५ या कालावधीत या जलकुंभावर ‘व्हॉल्व्हमॅनचे काम करूनही महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि खासगी ठेकेदारांच्या नात्यागोत्यातील व्यक्तींचाच भरणा केला आहे. त्यांना पालिकेच्या सेवेत घेण्यासाठी अनुभवाची बनावट प्रमाणपत्रे तसेच बोगस रजिस्टर बनवून त्यामध्ये काही नावे समाविष्ट केली आहेत. संबंधित उमेदवाराने तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या आस्थापनेवर काम केले आहे की नाही, याची चौकशीही झालेली नाही. महापालिकेच्या जलकुंभावरील कार्यरत कर्मचाऱ्यांची नोंदच महापालिकेकडे नसल्याचे निदर्शनास आले असून अशांची कोणतीही माहिती न घेता अत्यंत घाईघाईने भरती का करण्यात आली? भरती झालेल्या निवड यादीमध्ये डोंगरीपाडा जलकुंभावरील ठेकेदाराचा सहकारी, वाहनचालक आणि दोन नातेवाईक अशा चौघांचा तसेच पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या दोन नातेवाइकांचाही यामध्ये समावेश आहे. अनेकांची अनुभव नसतानाही प्रतीक्षा यादीत नावे आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)