शहापूरमध्ये रोजगार हमी योजनेला लागली घरघर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 12:23 AM2019-12-08T00:23:31+5:302019-12-08T00:24:09+5:30
शहापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेला घरघर लागली आहे.
शेणवा : शहापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेला घरघर लागली आहे. या योजनेंतर्गत जॉब कार्डधारक ३५ हजार ४७३ मजुरांची शासकीय नोंद असताना केवळ ४७१ मजुरांनाच रोजगार मिळाल्याची आकडेवारी शहापूर तहसीलदार कार्यालयातून हाती आली आहे.
तालुक्यात केवळ ११८ कामे सुरू आहेत. यात वन विभागाची रोपवाटिका, नैसर्गिक रोपांचे संगोपन करणे आणि कृषी विभागाची फळबाग लागवड आणि ग्रामपंचायतीची घरकुल योजनेची अशी तुटपुंजी कामे आहेत. या कामांवर फक्त ४७१ स्थानिक मजुरांना रोजगार मिळाल्याची नोंद शासनदप्तरी आहे. या मजुरांना गावपातळीवर ग्रामपंचायत स्तरावर जॉबकार्ड देण्यात आले आहेत, तर त्यांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे. शासकीय दराप्रमाणे प्रत्येकी मजुरास २०६ रु पये अशी अल्प मजुरी दिली जात आहे.
ही मजुरी तर तुटपुंजी आहेच, शिवाय मजुरीचे पैसेही रोखीच्या स्वरूपात न मिळता ते मजुरांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. यावर आदिवासी समाधानी नाहीत. या तुटपुंज्या मिळणाऱ्या शासकीय मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असल्याने वाढीव आणि रोखीच्या स्वरूपात मिळणाºया मजुरीच्या शोधात मंजूर रोजगारासाठी तालुक्यातून स्थलांतर करत आहेत. यामध्ये आदिवासी मजुरांचा जास्त समावेश आहे.
तालुक्यातील वासिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, कसारा परिसरांतील आदिवासींनी रोजगाराच्या शोधात आपल्या पोराबाळांसह शहराची वाट धरली आहे. कल्याण, भिवंडी, ठाणे, वसई, विरार, भार्इंदर, मीरा रोड या शहरी भागांत आणि काही ग्रामीण भागांतील वीटभट्ट्यांवर तसेच इमारतीच्या बांधकामांवर हे मजूर रोजगारासाठी आपले गाव सोडून इतरत्र स्थलांतरित झाले आहेत.
आदिवासी वस्त्यांकडे जाणाºया रस्त्यांचे खडीकरण, गटार खोदणे, मातीकाम अशी विविध कामे वनखात्याच्या हरकतीमुळे रखडली आहेत. त्यामुळेच मजुरांना मंजुरी मिळणे अशक्य झाले असल्याने मजूर रोजगारासाठी अन्य ठिकाणी स्थलांतर करत आहेत.
- आर.आर. शिवदे, शाखा अभियंता, रोजगार हमी योजना, सा.बां. उपविभाग क्र मांक २, शहापूर