आदिवासींच्या अनेक पिढ्यांना मच्छीमारांनी पुरविला रोजगार
By admin | Published: September 26, 2016 01:58 AM2016-09-26T01:58:29+5:302016-09-26T01:58:29+5:30
जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील कुपोषणाला सर्वात जास्त जबाबदार ठरणाऱ्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे महत्वपूर्ण काम पालघर जिल्ह्यातील
हितेन नाईक, पालघर
जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील कुपोषणाला सर्वात जास्त जबाबदार ठरणाऱ्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे महत्वपूर्ण काम पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर राहणारा मच्छीमार समाज अनेक वर्षांपासून करीत आहे.
आज विक्रमगड, तलासरी, जव्हार, वाडा येथील ४ ते ५ हजार कुटुंब प्रमुखांना रोजगार व त्यांच्या राहण्याची सोय करून त्यांना विम्याचे कवच मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम मच्छीमार करीत आहेत. पालघर जिल्ह्यात झाई ते वसई दरम्यान १०७ कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा पसरला आहे. या किनारपट्टीवरील वसई, नायगाव, अर्नाळा, दातिवरे, एडवन, केळवे, माहीम, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेली-दांडी, डहाणू, इ. मच्छिमार गावातून सुमारे ३ हजार लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जाते. यातील एका नौकेवर साधारणपणे ७ ते २० लोकांची कामगार म्हणून गरज भासते. त्यामुळे आज ४ ते ५ हजार कामगारांना रोजगाराची महत्वपूर्ण संधी मच्छीमार व्यवसायातून मिळत आहे. नवीन कामगाराला ८ ते १२ हजारा प्रती महिना पर्यंत पगार दिला जात असून मुख्य तांडेल म्हणून काम करणाऱ्याला ८ महिन्याचा २ ते ३ लाखापर्यंत पगार दिला जात आहे. दोन वेळचे जेवण, नाश्ता, दाढी, वैद्यकीय उपचार, करमणुकीची साधने, झोपण्याची साहित्य इ, सुविधाही नौका मालका कडून विनामूल्य पुरवल्या जात आहेत. या व्यतिरिक्त एखादा अपघात झाल्यास २ लाखाच्या निधीचे विमा कवचही त्यांना देण्यात येत असल्याने अनेक कुटुंबे मागील चाळीस ते पन्नास वर्षांपासून या व्यवसायात आहेत.
पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, इ. तालुक्यातील कुपोषणाचे पडसाद राज्यभर उमटले असून हा कुपोषणाचे पूर्णत: उच्चाटन करायचे असेल तर कुपोषणग्रस्त भागात रोजगार निर्मिती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत महिला, बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्यामुळे नरेगा, मगांरोहमी योजनांची कामे तात्काळ हाती घेण्याचे आदेश ही जिल्हा प्रशासन यंत्रणांना देण्यात आले आहेत. परंतु या योजनांची अंमलबजावणी करताना मोठा भ्रष्टाचार होऊन बोगस नावे मस्टर मध्ये नोंदवून पैसे लाटण्याचे धंदे जोरात सुरु होते. जिथे कामे हाती घेण्यात आली होती, त्यावरील कामगारांच्या खात्यात २-४ महिने पैसेच जमा होत नसल्याने उपासमारी आणि दारिद्र्याला कंटाळून ते कच्च्या-बच्च्यांसह रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरे करीत आहेत. ही मोठ्या प्रमाणात होणारी स्थलांतरे रोखण्याचे काम प्रशासना कडून करण्याचा प्रयत्न अनेक योजना मार्फत केली जात असली तरी मच्छीमारी व्यवसायातून मिळाले ली रोजगाराची हमी, घेण्यात येत असलेली काळजी तसेच रोजगारा सोबत त्यांना घरातील कुटुंबातील सदस्या प्रमाणे आपुलकीची वागणूक असल्याने तीन पिढ्यातील सदस्य एकाच मच्छीमार कुटुंबात अनेक वर्षा पासून राहत आहेत. विक्रमगडच्या दादडा पाड्यातील देवू जाबर (६२), गोविंद गिम्बल (६१), शिवा आणि सखाराम फरारा (५९) या दोन बंधू सह अनेक आदिवासी कुटुंबातील सदस्य मागील चाळीस ते पन्नास वर्षा पासून सातपाटी येथे आपल्या नौकेवर कार्यरत असल्याचे कव-दालदा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मेहेर यांनी लोकमत ला सांगितले.