रस्ते जोडले तरच वाढेल रोजगार, कनेक्टिव्हिटी असेल तरच राज्याचा विकास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 10:15 AM2023-02-07T10:15:25+5:302023-02-07T10:16:39+5:30
ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे एमसीएचआय क्रेडाई, ठाणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी मेळ्याला शिंदे यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारच्या काळात विकास थांबला होता.
ठाणे : राज्याचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी रस्ते जोडणी महत्त्वाची आहे. कनेक्टिव्हिटी असेल तरच राज्याचा विकास होतो, शिवाय रोजगारही उपलब्ध होतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानुसार समृद्धी महामार्ग, बोरीवली टनेल आदींसह फ्री वेचा विस्तार फाउंटनपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे एमसीएचआय क्रेडाई, ठाणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी मेळ्याला शिंदे यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारच्या काळात विकास थांबला होता. परंतु जेव्हापासून सर्वसामान्यांचे सरकार राज्यात आले आहे, तेव्हापासून विकासाला वेग आला आहे. नवनवीन प्रकल्प हाती घेतले जात आहेत, नवनवीन करार केले जात आहेत. विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तुम्ही घर बांधता, घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. कोणाचे वन, टू, थ्री बीएचके अशी प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. परंतु ज्याच्या खिशात जेवढे पैसे त्यानुसार घर खरेदीला पसंतीक्रम दिला जातो. कोविडमध्ये सर्वांना त्रास झाला. मात्र त्या काळात सरकार आणि लोकल बॉडीलादेखील विकासकांनी सहकार्य केले. आपल्या शहराचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने काम करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
युनिफाइड डीसीआरचा फायदा
युनिफाइड डीसीआर या नव्या कायद्याचा फायदा झाला आहे. परंतु त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांचे हित जपतो, म्हणून माझ्यावर टीका झाली. या क्षेत्रातील नेमक्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याकरिता तशी नियमावली करणे गरजेचे होते. नियमावली केवळ कागदावर राहू नये आणि त्याच्या अंमलबजावणीचा फायदा नागरिक तसेच बांधकाम क्षेत्राला व्हावा, यासाठी बांधकाम संघटनेशी चर्चा केली. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते आणि त्यामुळेच या क्षेत्राला सवलती देण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.