आईस्क्रीम, कुल्फी विक्रीतून तरूणांना मिळतो रोजगार
By admin | Published: May 23, 2017 01:24 AM2017-05-23T01:24:41+5:302017-05-23T01:24:41+5:30
कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे गावपाड्यात आईस्क्रीम, कुल्फी विकून अनेक तरूण सध्या रोजगार मिळवित आहेत. उन्हाळा आला की थंडगार पदार्थ खाण्याची प्रत्येकाची इच्छा होते
शशिकांत ठाकूर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कासा : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे गावपाड्यात आईस्क्रीम, कुल्फी विकून अनेक तरूण सध्या रोजगार मिळवित आहेत. उन्हाळा आला की थंडगार पदार्थ खाण्याची प्रत्येकाची इच्छा होते. मात्र खेडयापाडयात आदिवासी भागात थंड पदार्थ कोठून मिळणार? मात्र बेरोजगार तरूण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हाळयात अनेक किलोमीटर आईस्क्रीमची गाडी ढकलत कमाई करतात. व त्यातून खेडयापाडयातील मुलांबरोबरच नागरिकांनाही थंडगार आईस्क्रीम, कुल्फीचा आस्वाद मिळतो.
शहराकडे उन्हाळयात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कुलर, एसी, फॅन आदि सुविधेबरोबरच शरीराला थंड करण्यासाठी फ्रीज थंडगार पाणी तसेच विविध थंडपेय मिळतात. मात्र खेडयापाडयातील मुले व नागरिक त्यापासून लांबच असतात. गरीब आदिवासी नागरिक थंडपाण्यासाठी माठाचा आधार घेतांना दिसतात. तसेच लहान मुले तर दुपारच्या वेळेस नदी, नाल्यात डुंबतांना दिसतात.
खेडयापाडयात आईस्क्रीम , कुल्फी विकून स्थानिक तरूणांबरोबरच परराज्यातील तरूणही उन्हाळयात रोजगार मिळवतात. उत्तर प्रदेशातील ताराखुर्दे येथील उमाशंकर निशाद, व बाबुराव निशाद हे दिवसभर अनेक कि.मी.आईक्रीमची ढकलून दिवसाकाठी ३०० ते ३५० रू. कमवतात. यामध्ये खेडयातील मुलांना परवडणारी २ रू. ५ रू. किंमतीचे असे ७०० ते ८०० आईसफ्रूट दररोज विकतात. तर एखाद्या ठिकाणी लग्न समारंभ असल्यास दिवसभर जास्त भटकंती करण्याची गरज नाही कारण लग्नातच आईस्क्रीमची मोठी विक्री होत असल्याचे उमाशंकर यांनी सांगितले. तसेच उन्हाळयात ४ महिने आपण हे काम करीत असून ४ महिन्याला साधारण ३० ते ३५ हजाराची कमाई करीत असल्याचेही त्यांनी सांगितले व पावसाळयात घरी शेतीची कामे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.