संमेलन कार्यालय रिकामे करा
By admin | Published: April 27, 2017 11:56 PM2017-04-27T23:56:55+5:302017-04-27T23:56:55+5:30
अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ‘आगरी युथ फोरम’ या संस्थेला कल्याण-डोंबिवली महापालिकेने
जान्हवी मोर्ये / डोंबिवली
अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ‘आगरी युथ फोरम’ या संस्थेला कल्याण-डोंबिवली महापालिकेने सहा महिन्यांसाठी चार रस्त्यानजीकच्या ‘जगन्नाथ प्लाझा’ इमारतीत कार्यालयासाठी जागा दिली होती. मात्र, त्याची मुदत संपल्याने हे कार्यालय आता रिकामे करावे, अन्यथा तेथील साहित्य फोरमच्या कामाचे नाही, असे समजून त्याचा ताबा घेतला जाईल, अशी नोटीस महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापकांनी बजावली आहे.
साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान डोंबिवलीत झाले. त्यासाठी महापालिकेने एक रुपया भाडेतत्त्वावर जगन्नाथ प्लाझा इमारतीतील जागा फोरमला संमेलनाच्या कार्यालयासाठी दिली होती. ही जागा महापालिकेच्या आरक्षणातून वाचनालयासाठी देण्यात येणार आहे. त्या जागेत अद्याप वाचनालय सुरू झाले नसल्याने त्याचा उपयोग साहित्यिक उपक्रमासाठी करण्याचे महापालिकेने ठरवले. त्यामुळेच ही जागा संमेलनाच्या कार्यालयासाठी आॅक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ या सहा महिन्यांसाठी देण्यात आली. मात्र, आता त्याची मुदत संपल्याने ते रिकामे करण्याची नोटीस मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापकांनी बजावली आहे. त्यानुसार, तीन दिवसांत कार्यालय रिकामे न केल्यास त्यातील साहित्यासह जागेचा ताबा घेतला जाईल, असा इशारा त्यांनी नोटीसमध्ये दिला आहे.
यासंदर्भात महापौर राजेंद्र देवळेकर यांना विचारले असता, हा प्रश्न महासभेत उपस्थित करण्याइतका मोठा नाही. ही प्रशासकीय बाब आहे. प्रशासकीय स्तरावर त्याचा निर्णय घेतला जाईल. संमेलन कार्यालयासाठी एक रुपया भाडेतत्त्वावर ही जागा वापरासाठी सहा महिन्यांकरिता दिली होती. साहित्य संमेलन तसेच कार्यालयाची मुदत संपल्याने ही नोटीस बजावली आहे.
याविषयी आगरी युथ फोरमचे पदाधिकारी म्हणाले की, महापालिकेने नोटीस बजावली असली तरी संमेलनाचे कामकाज अजूनही संपलेले नाही. त्यामुळे कार्यालय सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी फोरमने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यासाठी भाडे द्यावे लागले, तरी ११ महिन्यांचा भाडेकरार करून कामकाज सुरू ठेवता येईल. तसा पत्रव्यवहार मालमत्ता व्यवस्थापकांशी केला जाईल. पुढील साहित्य संमेलनापर्यंत याच साहित्य संमेलनाच्या कार्यालयातून कारभार सुरू राहील, असेही ते म्हणाले.