शहरातील विठ्ठल मंदिरात शुकशुकाट; मंदिर व्यवस्थापनाने मूर्ती पूजन केले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:16 PM2020-07-01T12:16:59+5:302020-07-01T12:21:48+5:30
पण कुठेही गर्दी नसल्याने मंदिर व्यवस्थापनात कोणताही अडथळा आला नाही.
डोंबिवली: शहरातील पूर्वेला, पश्चिमेला विठ्ठल रखुमाईची चार मंदिर आहेत, त्यापैकी दत्तनगर आणि दीनदयाळ पथ येथील मंदिर ही प्रतिपंढरपूर समजली जातात. कोरोनाच्या धर्तीवर मंदिर बंद असल्याने भक्तांचा हिरमोड झाला असून लाडक्या विठुरायाचे मंदिराबाहेरून दर्शन घेण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी बुधवारी पहाटे 6 ते 8 वाजेपर्यंत हजेरी लावली होती. पण कुठेही गर्दी नसल्याने मंदिर व्यवस्थापनात कोणताही अडथळा आला नाही.
व्यवस्थापनाने विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजाअर्चा केली. बहुतांशी मंदिरात तुळशी हार घालून मूर्ती सजवण्यात आल्या होत्या. शहरात 2 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन घेतला जाणार असल्याने नागरिकांनी मंदिर बंद असल्याने तेथे बाहेरून दर्शन घेत बाजारहाट करण्यासाठीची लगबग दिसून आली. ज्येष्ठ नागरिक भक्तांमध्ये वारी झाली नाही, विठ्ठलाचे दर्शन झाले नाही ही खंत व्यक्त झाली असली तरी हे पण दिवस जातील अशीही समाधानाची प्रतिक्रिया सांगण्यात आली. कोरोनाचे संकट जाऊ दे, बळीराजाला बळ मिळू दे, जुलै सुरू झाला पण पावसाचा पत्ता नाही, तो देखील पडायला हवा अशीही काही भक्तांनी मागणी केली.