कुपोषणमुक्तीसाठी स्थानिक पाककलांना प्रोत्साहन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:01+5:302021-09-05T04:46:01+5:30
ठाणे : कुपोषणमुक्तीसाठी ‘पोषण माह’ या अभियानातून विविध उपक्रम जिल्ह्यातील महिला, युवतींबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत नियोजनबद्ध पोहोचविणे आवश्यक आहे. ...
ठाणे : कुपोषणमुक्तीसाठी ‘पोषण माह’ या अभियानातून विविध उपक्रम जिल्ह्यातील महिला, युवतींबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत नियोजनबद्ध पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देऊन जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी स्थानिक पदार्थांच्या पाककलांना प्रोत्साहन देण्याची अपेक्षा त्यांनी जिल्हा परिषदेकडून व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात केंद्र शासनाच्या मातृ वंदना योजनेद्वारे ‘पोषण महा सप्टेंबर २०२१’ साजरा केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह महिला व बालकल्याण विभागाच्या समन्वयातून हा महा साजरा केला जात आहे. या कालावधीदरम्यान विविध उपक्रम हाती घेतले. या महाच्या उद्घाटनास अनुसरून जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी स्थानिक पोषण आहाराचे महत्त्व वाढवण्याच्या गरजेसह स्थानिक पदार्थांच्या पाककलेला प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कुपोषण रोखण्यासाठी झोळीमुक्ती व हिमोग्लोबिन चाचणी, उपचार व संवाद आदी सुरू केलेले उपक्रम महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करून त्यांनी तरुणांना स्वयंरोजगाराच्या योजना सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
या उपक्रमांवर दिला भर
जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविकांसह आरोग्य विभागाने या महिन्यात कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. यामध्ये स्थलांतरित लाभार्थींसाठी पोषण कार्ड वाटप; गृहभेटी दिल्या जाणार आहे. पोषणवाटिका नावाने वृक्षारोपण उपक्रम, गरोदर महिला व किशोरींसाठी हिमोग्लोबिन चाचणी, उपचार व संवाद उपक्रम, पौष्टिकतेसाठी योगसत्र, पाककला स्पर्धा, पोषण किट, पोषण समृद्धीकरण उपक्रम, सॅम मुलांची निश्चिती करून पौष्टिक आहाराचे वाटप करण्यासाठी नियोजन केले आहे.