अतिक्रमणामुळे कोंडीची स्थिती ‘जैसे थे’; आता जीवानिशी गेल्यावर जाग येणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:38 PM2019-10-27T23:38:16+5:302019-10-28T06:19:39+5:30

कल्याण-डोंबिवली शहरात अरुंद रस्ते, जागोजागी अतिक्रमण करणारे फेरीवाले यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर गर्दीच्या वेळी पाय ठेवायलाही जागा नसते

The encroachment caused Condi's position to be 'the same'; Will you wake up when you go to life? | अतिक्रमणामुळे कोंडीची स्थिती ‘जैसे थे’; आता जीवानिशी गेल्यावर जाग येणार का?

अतिक्रमणामुळे कोंडीची स्थिती ‘जैसे थे’; आता जीवानिशी गेल्यावर जाग येणार का?

Next

प्रशांत माने, डोंबिवली

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा नवीन नाही. आमचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी फेरीवाल्यांकडून सातत्याने होत आहे. मात्र, केडीएमसीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. अतिक्रमणामुळे कोंडीची स्थिती ‘जैसे थे’ असताना बसण्याच्या जागेवरून फेरीवाल्यांमध्ये जुंपण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, फेरीवाला धोरण राबविण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे.
शहर फेरीवाला समिती ही आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात स्थापन झाली होती. त्यानंतर आयुक्त म्हणून आलेले ई. रवींद्रन यांनी फेरीवाल्यांच्या विषयात सकारात्मक दखल घेतली होती. तर विद्यमान आयुक्त गोविंद बोडके यांनीही शहरातील फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांना ओळखपत्र व नव्याने जागा देण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता. पण आजतागायत हा निर्णय अंमलबजावणीअभावी कागदावरच राहिला आहे. दरम्यान, केडीएमसीकडून २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षण यादीत असलेल्या फेरीवाल्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग खरे तर मोकळा झाला आहे. पण, विलंबाचे कारण काय? याचे गूढ कायम आहे. फेरीवाला सर्वेक्षणानुसार महापालिका हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिका त्यांना ओळखपत्र तसेच व्यवसायासाठी जागा ठरवून देणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले याप्रमाणे काही ठिकाणी पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक स्थळे, महाविद्यालये, शाळा, सरकारी कार्यालयांपासून १०० मीटर अंतरापर्यंतही व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई केली आहे. पण, केडीएमसीकडून ठोस अंमलबजावणीला आजतागायत सुरुवात झालेली नाही. फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. एकीकडे रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांना व्यवसाय क रण्यास मज्जाव केला असला तरी न्यायालयाच्या आदेशाची ऐशीतैशी झाल्याची प्रचिती कल्याण आणि डोंबिवलीमधील स्कायवॉकवरील वास्तव पाहता येते. फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकांच्या कृपाशीर्वादाने स्कायवॉकवर काही फेरीवाल्यांनी ठाण मांडले असताना जे फेरीवाले मनाई केलेल्या क्षेत्राच्या बाहेर प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांना मात्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. दुकानदारांकडून तसेच वाहन पार्क करणाऱ्यांकडून त्यांना विरोध होत आहे. त्यामुळे १५० मीटरच्या परिक्षेत्राबाहेर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांचा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे.

फेरीवाल्यांना बसू दिले जात नसल्याने वादविवादाचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. डोंबिवलीतील फडके रोडवर मध्यंतरी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करणारे बेकायदा फलकही लावले गेले होते. त्यामुळे लवकर पुनर्वसन व्हावे आणि आम्हाला आमची हक्काची जागा मिळावी, अशी मागणी फेरीवाले करत असले तरी दुसरीकडे बसण्याच्या जागेवरून फेरीवाले आता एकमेकांच्या जीवावरही उठले आहेत.

पूर्वेकडील रेल्वे स्थानक नजीक असलेल्या शिवसेना शाखेसमोर पदपथावर बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात सलाउद्दीन सिद्दिकी शेख या फेरीवाल्याने जाफर अली इंद्रिसी या फेरीवाल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मागील आठवड्यातील सोमवारच्या बाजारात घडली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न करणाºया सलाउद्दीनला रामनगर पोलिसांनी अटक केली. बसण्याच्या जागेवरून जीवघेणी झालेली मारहाण ही गंभीर बाब आहे.

हल्ला करणारा आणि जखमी झालेला हे दोघेही फेरीवाले कुर्ला आणि वांद्रे येथील राहणारे आहेत. व्यवसाय करण्यासाठी बाहेरून डोंबिवलीत येणारे बहुतांश फेरीवाले हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, याचा नमुनाही या हल्ल्यातून दिसला. बाहेरचे फेरीवाले स्थानिक फेरीवाल्यांवरही दादागिरी करतात. याआधीही बसण्याच्या जागेवरून तसेच व्यवसाय करण्यावरून स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असे वाद झाले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हेही दाखल झाले आहेत. वादावादी, हल्ल्यांचे प्रकार सुरूच राहिले आहेत. या वाढत्या घटनांची गांभीर्याने दखल महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी घेतली पाहिजे. फेरीवाल्यांनाही रोजगाराचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. पण त्यासाठी आखून दिलेल्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
नुकत्याच घडलेल्या घटनेवरून तरी शहाणे बनून तातडीने महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तेव्हाच कुठेतरी बाहेरील फेरीवाल्यांचे लोंढे थांबून स्थानिकांना न्याय मिळेल. अन्यथा अतिक्र मणाचे चित्र कायम राहून वादाचे आणि हल्ल्यांचे प्रकार सुरूच राहतील, यात शंका नाही.

कल्याण-डोंबिवली शहरात अरुंद रस्ते, जागोजागी अतिक्रमण करणारे फेरीवाले यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर गर्दीच्या वेळी पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय रस्ते, पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या आणखीनच बिकट होत आहे. जागेवरून दररोज उडणारे खटके जीवघेण्या हाणामारीपर्यंत पोहचल्या आहेत. या बसण्याच्या जागेच्या वादातून नुकतीच डोंबिवलीत फेरीवाल्यावर झालेला हल्ला हा पुढील धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे कुणाचा तरी जीव गेल्यावरच फेरीवाला धोरण राबवण्यासंदर्भात केडीएमसीला जाग येणार का, असा सवाल करण्यात येत आहे.

Web Title: The encroachment caused Condi's position to be 'the same'; Will you wake up when you go to life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.