उल्हासनगर महापालिका शाळेवर अतिक्रमण? माजी नगरसेवकासह नागरिकांचा निषेध
By सदानंद नाईक | Published: November 21, 2022 05:39 PM2022-11-21T17:39:44+5:302022-11-21T17:40:24+5:30
उल्हासनगर महापालिका उद्यान, मैदान, शाळा, शौचालय, समाजमंदिर व खुल्या जागा आदिवर भूमाफियांची नजर गेली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील मासे मार्केट शेजारील महापालिका शाळा क्रं-२२ च्या मैदानावर दगड मातीची भरणी करून जेसीबी मशीनद्वारे सपाटीकरण करण्याचा प्रयत्न जागृत नागरिकांनी हाणून पाडला. याविरोधात माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी, प्रधान पाटील, समाजसेवक नरेश तहेलरामानी यांच्यासह अनेकांनी रविवारी हाताला काळ्या फिता लावून निषेध केला.
उल्हासनगर महापालिका उद्यान, मैदान, शाळा, शौचालय, समाजमंदिर व खुल्या जागा आदिवर भूमाफियांची नजर गेली. यापूर्वी शाळा जागेवर अतिक्रमण झाल्याचे प्रकार झाले. कॅम्प नं-५ येथील महापालिका शाळा क्रं-२२ चे मोठे मैदान असून याठिकाणी शालेय क्रीडा स्पर्धा व मुले खेळतात. अशी माहिती समाजसेवक व शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नरेश तहलरामानी यांनी दिली. दरम्यान काही दिवसांपासून शाळेच्या मैदानाचा प्रवेशद्वार बंद करून मैदानावर दगड माती टाकून जेसीबी माशीनद्वारे सपाटीकरण केले जात आहे. अशी माहिती माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी, प्रधान पाटील , नरेश नहेलरानी यांना मिळाल्यावर त्यांनी मैदानाची पाहणी करून असंख्य नागरीकासह हाताला काळ्या फिता लावून रविवारी दुपारी निषेध केला. तसेच याबाबतची माहिती महापालिका आयुक्तांना दिली.
महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांनी सोमवारी सकाळी शाळा क्रं-२२ च्या मैदानाची पाहणी करून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना माहिती दिली. तर याबाबत संध्याकाळी प्रसिद्धपत्रक काढणार असल्याची माहिती लेंगरेकर यांनी दिली. यापूर्वीही महापालिका शाळेच्या जागेवर अवैध बांधकाम केल्याचा प्रकार घडले आहे. तर हजारो मुले शिक्षण घेणाऱ्या खेमानी येथील महापालिकेची मराठी व हिंदी माध्यमाच्या शाळेची जागा एका खाजगी संस्थेला देण्याचा प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत मंजुरी दिल्याचा प्रकार घडला. याप्रस्तावाला प्रचंड विरोध झाल्यावर, महापालिकेने सदर ठराव राज्य शासनाकडे खंडित करण्यासाठी पाठविला असून तसाच प्रकार शाळेच्या मैदानाबाबत झाल्याचे बोलले जात आहे.
शाळा मैदानांवर डोळा
महापालिका शाळा क्रं-२२ च्या मैदानावर भूमाफियांचा डोळा असून प्रांत कार्यालयाकडून त्याची सनद काढल्याची शक्यता माजी नगरसेवकांनी व्यक्त केली. महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता शाळा मैदानावर प्रांत कार्यालयाने सनद दिली असल्यास, यामागील रॅकेटवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कॅम्प नं-५ येथील दूधनाका येथील महापालिका शाळेच्या जागेवर अवैध बांधकामे झाल्याचे बोलले जात असून महापालिकेकडून काहीएक कारवाई नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"