दिव्यामध्ये दीड हजार घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:33 AM2020-01-07T05:33:34+5:302020-01-07T05:33:39+5:30
सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले.
ठाणे : दिवा डम्पिंगच्या बाजूस असलेल्या सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळींचे बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून सोमवारी जमीनदोस्त केले. या चाळींमधील १५०० पेक्षा जास्त घरे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आली. गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई जिल्हा प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात पार पाडली आहे. सुमारे अडीच ते तीन एकरांवरील अतिक्रमणे या कारवाईदरम्यान पाडण्यात आली.
उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा व अन्य राज्यांतील रहिवाशांचे या चाळींमध्ये वास्तव्य होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून सरकारी जमिनीवर बिनदिक्कतपणे या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. परराज्यांतून आलेल्या रहिवाशांना त्यातील घरे अल्प किमतीत विकून भूमाफिया फरार झाले आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कारवाई सुरू झाली, तेव्हा प्रारंभी रहिवाशांनी कडाडून विरोध केला. येथील युवक, युवती आणि महिलांनी जेसीबीसमोर उभे राहून त्यांनी या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी तर जेसीबीवर चढून चालकास दम देण्याचाही प्रयत्न केला. रहिवाशांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई काही काळ थांबवली.
न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. त्यानुसार, केवळ दुकाने तोडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाने केले. त्यानंतर, पोलिसांनी गर्दी हटवून दुपारी दीड वाजता पुन्हा कारवाई सुरू केली. एकावेळी पाच चाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यास प्रारंभ झाला. या वेळी मात्र पोलिसांच्या भीतीमुळे एकाही रहिवाशाने कारवाईत अडथळा आणला नाही. सर्व्हे नंबर २७३ आणि २७५ या दोन्ही सरकारी भूखंडांवर समोरासमोर असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रहिवाशांच्या चाळी चोख व कडक पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आल्या.
या दोन्ही भूखंडांवरील ३९ चाळी तोडण्यासाठी सहा जेसीबी, एक पोकलेन मशीनचा वापर करण्यात आला. एका चाळीत सुमारे ३० ते ३५ घरे होती. त्यानुसार, एक हजार ५०० खोल्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या कडक बंदोबस्तात तोडण्यात आल्या. सुमारे ३५० पोलीस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ यावेळी तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी पोलीस अधिकाऱ्यांसह पुरुष आणि महिला पोलीस शिपाई यावेळी तैनात करण्यात आले होते.
>३९ चाळींवरच कारवाई
गेल्या काही वर्षांमध्ये राबवलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमांपैकी ही सर्वात मोठी आणि धडक कारवाई असल्याची चर्चा येथे सुरू होती. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत. या घरांच्या ३९ चाळींवर हातोडा पडला आहे. २०१० नंतरच्या रहिवासी चाळी असल्यामुळे या रहिवाशांचे पुनर्वसन करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून सांगितले जात आहे. या जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम करणाºया विकासकांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या ३९ चाळी तोडल्यानंतर येथील उर्वरित चाळींवरही लवकरच कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.