भिवंडीत पुन्हा रस्त्यांवर अतिक्रमण
By admin | Published: January 6, 2017 06:09 AM2017-01-06T06:09:34+5:302017-01-06T06:09:34+5:30
महापालिका शहरातील अतिक्रमणांवर सध्या कारवाई करत नसल्याने हा विभाग थंड झाल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे
भिवंडी : महापालिका शहरातील अतिक्रमणांवर सध्या कारवाई करत नसल्याने हा विभाग थंड झाल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे. त्यामुळे सर्व रस्ते व पदपथांवर दुकानदार, फेरीवाले व हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात पाच प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दरगुरुवारी अतिक्रमणविरोधी पथकाचे कर्मचारी अतिक्रमणे हटवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र, दीड महिन्यापूर्वी दोन गुरुवारी ही कारवाई केल्यानंतर खंड पडला. त्यामुळे शहरात पुन्हा अतिक्रमणे वाढल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काहींनी पदपथांवर आपली दुकाने थाटली आहेत. पदपथांवरून पादचारी जाऊ लागले की, त्यांना अतिक्रमण करणारे फेरीवाले व दुकानदार रस्त्यावरून जाण्यास सांगतात. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत, महापालिकेकडे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणचे अतिक्रमण हटवत प्रत्येक गुरुवारी ही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यानंतर, ही कारवाई न झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील काही नागरिक व सामाजिक संस्था पदपथ पादचाऱ्यांकरिता रिकामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली. (प्रतिनिधी)