नामफलकांवर लोकप्रतिनिधींच्या नावांचे अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 12:37 AM2019-12-23T00:37:08+5:302019-12-23T00:37:23+5:30

ठाणेकरांमध्ये संतापाची लाट : शहरामध्ये लोकचळवळ उभारण्याची तयारी सुरू

Encryption of names of people's representatives on nominations | नामफलकांवर लोकप्रतिनिधींच्या नावांचे अतिक्रमण

नामफलकांवर लोकप्रतिनिधींच्या नावांचे अतिक्रमण

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : श्रीस्थानक ते स्मार्ट सिटी असा प्रवास करणाऱ्या ठाणे शहरातील मैदाने, रस्ते, परिसर, चौक आदींचे सुशोभीकरणाचे अनेक प्रयत्न होत आहेत. त्याद्वारे बहुतांश चौकांचे नामकरण व त्यानंतर सुशोभीकरणही झाले. पण, आता या महापुरुष, संत महात्मे, कवी, लेखक यांच्या नावे असलेल्या चौकाच्या नामफलकांवर आमदार, स्थानिक नगरसेवक, सामाजिक संघटना, मंडळे आदींची नावेही स्वर्णाक्षरात झळकविली जात आहे. हा विषय सध्या ठाणेकरांमध्ये चर्चेचा विषय झाला असून त्याविरोधात तीव्र संतापही व्यक्त होत असून ते लोकचळवळ उभारण्याच्या तयारीत आहेत.

महापुरुष, संतमहात्मे, ऐतिहासिक व्यक्ती आदींच्या चौकांच्या सुशोभीकरणासाठी लोकप्रतिनिधीचा निधी खर्च केला जात आहे. या खर्चातून शहरात वेळोवेळी नावीन्यपूर्ण संकल्पनांना मूर्त स्वरूप देऊन लोकप्रतिनिधींनी मौलिक हातभार लावला आहे. पण, या महात्म्यांच्या नावांच्या फलकांवर त्यांचेही नाव स्वर्णाक्षरांत लिहिण्याच्या या पद्धतीमुळे ठाणेकरांमध्ये संताप ऐकायला मिळत आहे.
शहरातील ठिकठिकाणच्या चौकांचे नामकरण व सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यात इतिहासकालीन युगपुरु ष, संतमहात्मे, प्रसिद्ध कवी, नामवंत लेखक, श्रद्धास्थाने आणि ठाणे शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असणाºया महापुरुषांची नावे देऊन नामकरण केले जाते. पण, आता या नामफलकांवर चौकांच्या सुशोभीकरणानंतर बहुतांश आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींसह काही ठिकाणी सामाजिक संस्था व मंडळे आदींची नावे बिनदिक्कत झळकवण्याची प्रथा ठाणे शहरात दिसून येत आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे.

येथील कोनशिला, फलकांवर झाले आहे अतिक्रमण
शहरातील रहिवाशांच्या वेगवेगळ्या करांतून उभ्या राहिलेल्या निधीतून चौकांचे सुशोभीकरण होते. पण संबंधित लोकप्र्रतिनिधीच्या नावाचा उल्लेख संत, महात्मे, महापुरुषांच्या नावापुढे होत असल्यामुळे त्याविरोधात शहरात ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊन त्यास आळा घालण्यासाठी लोक चळवळ उभी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. समारंभपूर्ण रस्त्यांचे, चौकांचे नामकरण विधिवत मोठ्या थाटात पार पडते. पण, आता या कोनशिलेवर संबंधित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निधीतून चौकाचे सुशोभीकरण व नामकरण करण्यात आले, हे कोरून ठेवलेले आहे. यामध्ये हरिकृष्ण पेंडसे लेनसह श्री घंटाळीदेवी चौक, वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग, कै. दि.ग. गांगल मार्ग, छत्रपती संभाजी महाराज पथ, श्री स्वामी समर्थ चौक, जनकवी पी. सावळाराम मार्ग आदी कितीतरी चौक व मार्गांच्या नामफलकांचा समावेश आढळून येत आहे.

प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू
या चौकांच्या नामफलकांवर लोकप्रतिनिधी, संस्था, मंडळं आदींची नावे प्रसिद्धी करण्याच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने व त्यांच्या सहकाऱ्यांनी महापालिका व अन्यही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या पद्धतीमध्ये बदल करून महापुरुष, संत, कवी, लेखक आदींच्या कार्याचा आदर्श टिकवणे व त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली तसेच विकासाच्या नावाखाली सुशोभीकरणाची कामे करण्यात येत आहेत. तेव्हा मूळ ठाण्यातील म्हणजेच नौपाड्यातील रस्त्यांसह चौकांच्या कोनशिला, नामफलक दुर्लक्षित होतानाही दिसून येत आहेत. त्यांची साधी निगासुद्धा राखली जात नसल्याचा आरोपही शहरातून होताना दिसत आहे.

नामफलकांची स्वच्छता हवी
कोनशिला, नामनिर्देशक फलक महिना पंधरवड्यातून कमीतकमी एकदा तरी स्वच्छ केले पाहिजेत. त्यावर जाहिराती लावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. जाहिरातीची पत्रके चिकटवणाºयास जबर दंड केला पाहिजे. आजूबाजूला कचरा टाकला जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. पक्षविरहित दृष्टिकोनातून विद्यमान लोकप्रतिनिधींनी सदर चौकांच्या संरक्षण, संवर्धनासाठी काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील काही चौकांच्या कोनशिलांच्या ठिकाणी दिवे लावण्यात आलेले होते. पण ते आता दिसेनासे झालेले आहेत. ते पूर्ववत केले पाहिजे म्हणजे रात्रीच्या वेळेस आसपास पुरेसा उजेड राहील.

सावरकरांच्या नामफलकाची अशी विटंबना
तीनपेट्रोलपंप परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पथाची नामनिर्देशिका आहे. या नामनिर्देशक फलक दुर्लक्षित होऊन त्यावर तेथील चहावाल्याकडून चक्क टेबल पुसण्यासाठी वापरले जाणारे फडके वाळत घालण्यात येत असल्याचे वास्तवही मोने यांनी निदर्शनात आणून दिले. विकासकामे जसे रस्ता रु ंदीकरण, पदपथ निर्मिती करताना यांची विटंबना होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणून कात टाकताना ठाणे शहराची एवढीतरी जुनी ओळख कायम राहावी, हीच माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी त्यांच्या पातळीवर चर्चा होऊन विचारविनिमयही केले जात आहे. प्रसंगी याविरोधात ते महापालिका आयुक्तांचा दरवाजा ठोठावण्याच्या प्रयत्नात आहेत.
 

Web Title: Encryption of names of people's representatives on nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.