साहित्य संमेलनचा हिशेब संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:41 AM2017-07-19T02:41:57+5:302017-07-19T02:41:57+5:30

शहरात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने ५० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते.

End of literature closing ends | साहित्य संमेलनचा हिशेब संपता संपेना

साहित्य संमेलनचा हिशेब संपता संपेना

Next

- जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने ५० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. संमेलनाचे आयोजक असलेल्या आगरी यूथ फोरमला २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. मात्र, उर्वरित २५ लाख रुपये फोरमला अजूनही मिळालेले नाहीत. फोरमला महापालिका आर्थिक अडचणी असल्याचे कारण सांगत आहे. त्यामुळे संमेलनाची २५ लाखांची देणी चुकती करता येत नाहीत. परिणामी, या सर्वाचा फटका संमेलनाच्या हिशेब सादरीकरणास बसला आहे.
डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान मोठ्या थाटामाटात झाले. या संमेलनाच्या आयोजनावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला. संमेलनाच्या आयोजनासाठी महापालिकेने पालकत्व स्वीकारत ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे २५ लाखांचा निधी संमेलनाच्या आयोजनासाठी आधीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. उर्वरित निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र संमेलनास पाच महिने झाली तरी २५ लाखांचा निधी अद्याप फोरमला मिळालेला नाही. या संदर्भात आयोजकांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे.
आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेकडून २५ लाखांचा निधी दिला जात नाही. मात्र, हा निधी दिला जाईल, असे आश्वासन वारंवार दिले जात आहे. या आश्वासनाची पूर्तता अद्याप केलेली नाही. आर्थिक स्थिती बिकट असतानाही महापालिकेतील कोट्यावधी रुपये खर्चाची विकासकामे मंजूर करण्यात येतात. त्याचे टेंडर काढले जाते. महापालिकेने संमेलनासाठी ५० लाखांची आर्थिक तरतूद केली होती. मात्र, ही रक्कम देण्यास महापालिका प्रशासनास काय अडचण आहे, असा सवाल साहित्यप्रेमींकडून केला जात आहे. महापालिकेने आर्थिक तरतुदीपेक्षा जास्त रक्कमेची विकासकामे घेतली आहेत. त्यामुळे महापालिकेने केलेली प्रत्यक्षातील तरतूद आणि घेतलेली विकासकामे यांचा ताळमेळ साधला जात नाही. या सगळ््याचा फटका संमेलन निधीस बसला आहे. महापालिकेकडून येणे वसूल झाले नसल्याने संमेलनाचा हिशेब पूर्णत्वास आलेला नाही.
साहित्य संमेलनासाठी डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावर जगन्नाथ प्लाझा येथे फोरमला कार्यालय देण्यात आले होते. ती जागा वाचनालयासाठी आरक्षित असल्याने ती साहित्यिक उपक्रमासाठी दिली गेली होती. संमेलन झाल्यावर तीन महिन्यांनी ही जागा रिकामी करण्याची नोटीस महापालिकेच्या प्रभाग अधिकारी व मालमत्ता व्यवस्थापकांनी फोरमला पाठविली होती.
मात्र देणीकरांची देणी अद्याप चुकती केलेली नाहीत. कार्यालय सोडले तर संमेलन आयोजकांनी पळ काढला, असा चुकीचा समज होईल. जोपर्यंत देणी चुकती होत नाही. तोपर्यंत कार्यालय त्याच ठिकाणी सुरू ठेवले जाईल. मुदत वाढवून मागण्याचे पत्र महापालिकेस दिले आहे. त्याचे भाडे भरण्याची तयारीही आयोजकांनी दर्शवली आहे.

२४ लाखांची देणी थकली
आगरी यूथ फोरमचे प्रमुख गुलाब वझे यांनी सांगितले, की संमेलनासाठी झालेल्या एकूण खर्चापैकी २४ लाखांची देणी बाकी आहेत. महापालिकेकडून २५ लाख येणे बाकी आहे. याशिवाय महाराष्ट्र बँकेकडून जाहिरातीपोटी तीन लाख रुपये येणे बाकी आहे, असे एकूण २८ लाख रुपये थकले आहे.
ही रक्कम वसूल होताच, २४ लाखांची थकीत देणी चुकती केली जातील. उर्वरित चार लाख रुपयांमधून वर्षभर साहित्यिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

Web Title: End of literature closing ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.