शनिवारअखेर दीड लाख ठाणेकरांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:05+5:302021-04-04T04:42:05+5:30
ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असून शनिवारअखेर एक ...
ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असून शनिवारअखेर एक लाख ५० हजार ४१३ लाभार्थ्यांचे ठाणे महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झाले असल्याची माहिती महापालिकेने दिली. शहरात लसीकरणाची व्याप्ती वाढवली असून जास्तीतजास्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तयार केलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्याटप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. यात आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर २० हजार ६९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ११ हजार १७७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये ९९ जणांना पहिला, तर एक हजार ६४० जणांना दुसरा डोस दिला आहे. फ्रंटलाइन कर्मचा-यांपैकी ठाणे महापालिकेच्या केंद्रात १७ हजार ३९५ लाभार्थ्यांना पहिला व आठ हजार २६५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून खाजगी रुग्णालयात ६४४ लाभार्थ्यांना पहिला व १८ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला आहे. ४५ ते ६० वयोगटांतर्गत ठामपा केंद्रात नऊ हजार ७८३ लाभार्थ्यांना पहिला, तर ८६ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. याच वयोगटांतर्गत खाजगी रुग्णालयांतील केंद्रामध्ये पाच हजार ६०४ लाभार्थ्यांना पहिला व दोन लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
- ७३ हजार ज्येष्ठांनी घेतला लाभ
६० वर्षांवरील नागरिकांमध्ये ठामपा केंद्रात ५३ हजार १८१ लाभार्थ्यांना पहिला व ४४२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये या वयोगटांतर्गत २० हजार २५९ लाभार्थ्यांना पहिला व २६ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
- ठाण्यात ५४ ठिकाणी लसीकरणाची सोय
सद्य:स्थितीत ठाणे महानगरपालिकेची लसीकरणाची ५४ सत्रे सुरू आहेत, त्यापैकी १७ सत्रे ही निश्चित असून उर्वरित सत्रे वैकल्पिक स्वरूपाची आहेत. ठाणे महानगरपालिकेची आरोग्य केंद्रे व ॲण्टीजेन चाचणी केंद्रे येथे असलेले लसीकरण निःशुल्क आहे, तर खाजगी रुग्णालयांमध्ये असलेल्या लसीकरणासाठी २५० रुपये आकारण्यात येत आहेत.