अभियंत्यांचे बिलांपेक्षा कामाकडे लक्ष हवे, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे परखड बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 09:24 AM2023-02-13T09:24:56+5:302023-02-13T09:25:42+5:30
रवींद्र चव्हाण : परिसंवादात महामार्ग तज्ज्ञ विजय जोशी यांचाही सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : काेणतेही काम पूर्ण करण्यासाठी झाेकून दिल्यास त्याचे साेने हाेते. मूळचे ठाणेकर असलेले ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया अवाॅर्डने सन्मानित झालेले महामार्ग निर्मितीतज्ज्ञ डाॅ. विजय जाेशी यांची कारकीर्द याची साक्ष देते. त्यामुळे राज्यातील रस्ते बांधकामासंबंधी अभियंत्यांनी बिलांपेक्षा प्रत्यक्ष जाऊन काम केले पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या याेग्य प्रकारे कामे झाली तरच रस्ते वर्षानुवर्षे टिकतील. मात्र हे हाेत नाही, अशी खंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. देशात तसेच राज्यात कोणत्याही रस्त्यांचे प्रश्न असू देत मी पूर्णपणे सेवा द्यायला तयार आहे, असे जोशी यावेळी म्हणाले.
ब्राह्मण सभेच्या माध्यमातून रविवारी संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी चव्हाण आणि जोशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोल्हटकर यांच्या प्रश्नांना दोघांनी दिलखुलास उत्तरे दिली. जाेशी म्हणाले की, परदेशात सेवा देताना नक्कीच पैसे मिळतात; पण भारतात सेवा देताना मी कोणताही माेबदला घेत नाही. २०१४ पासून मी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याशी रस्त्यांसंदर्भात दर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास संवाद साधत असताे.
भारतात माेठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना गटार नसणे, डांबराचा पाण्याशी सतत संपर्क हाेणे, यामुळे रस्ते खराब हाेतात. याबाबत रस्ते बनवताना जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. जल आणि सांडपाणी वाहिन्या, वीजवाहिन्या खाेलवर टाकणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. विनय भोळे, सुचेता पिंगळे, श्रीकांत कानडे हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
पाेलादाच्या मळीपासून रस्ते
डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पाेलादाच्या उत्पादनातून तयार हाेणाऱ्या मळीचा वापर करून रस्ते बांधले आहेत. या रस्त्यांत सिडनी विमानतळाची धावपट्टी, शेकडो किमी लांबीच्या महामार्गांचा समावेश आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली. त्यांनी ऑस्ट्रेलिया, कोरिया येथे रस्ते बनवले आहेत. ते सुमारे ३० वर्षे टिकतील, असा विश्वास तेथील अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.