कल्याणच्या युवा शिल्पकाराचे शिल्प वाढवतेय इंग्लंडची शान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 11:17 PM2019-12-09T23:17:26+5:302019-12-09T23:17:46+5:30
कल्याणच्या युवा शिल्पकाराचा पुतळा थेट इंग्लंडमध्ये उभा राहिल्याने कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कल्याण : पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी लढताना शीख सैनिक शहीद झाले. त्यांच्या पराक्रमाचे स्मरण राहावे, यासाठी त्यांच्या स्मरणार्थ यॉर्कशायर शहराजवळ शीख सैनिकाचा पुतळा नुकताच स्थापित करण्यात आला. हा पुतळा कल्याणचे युवा शिल्पकार जयदीप आपटे यांनी साकारला आहे. कल्याणच्या युवा शिल्पकाराचा पुतळा थेट इंग्लंडमध्ये उभा राहिल्याने कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिल्पकला आणि कल्याणचे नाते आणि नाव जागतिक कीर्तीवर पोहोचले आहे. कल्याणमध्ये राहणारे शिल्पकार भाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे आहेत. त्यांनी अनेक शिल्पे साकारली आहेत. त्यांची अनेक शिल्पे परदेशात आहे. त्यांच्यापाठोपाठ कल्याणचे युवा शिल्पकार आपटे यांचा पुतळा इंग्लंडमध्ये जाणे हे कल्याणच्या दृष्टीने भूषणावह आहे. या तरुण शिल्पकाराने शीख सैनिकाचा पुतळा साकारून जागतिक पातळीवर आपल्या शिल्पकलेचा ठसा कमी वयात उमटविला आहे.
इंग्लंडच्या यॉर्कशायर शहराजवळ शीख सोल्जर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या बाजूने पहिल्या व दुसºया महायुद्धात लढताना शीख सैनिकांनी शौर्य दाखविले होते. अनेक शीख सैनिकांना त्यावेळी वीरमरण आले होेते. त्यांचे वीरमरण कायम स्मरणात राहावे, यासाठी या असोसिएशनने हा पुतळा तयार करून घेतला आहे. या पुतळ्याचे यार्कशायर शहरात नुकतेच लोकार्पण करण्यात आले. जयदीप यांनी साकारलेला शीख सैनिकाचा पुतळा हा सात फूट उंच आहे. ब्रॉण्झ धातूचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे. त्यावर नाशिकमध्ये ब्रॉण्झ कास्टिंग करण्यात आले. १० आॅगस्टला हा पुतळा मुंबईहून इंग्लंडला बोटीने रवाना करण्यात आला. जयदीप हे ख्यातनाम शिल्पकार भाऊ साठे यांना गुरुस्थानी मानतात.