घोडबंदरच्या ‘नव ठाणेकरां’ची इंग्रजी पुस्तकांना पसंती, वाचकांमध्ये ५०० ग्रंथांची झाली देवाण घेवाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:40 AM2017-10-04T01:40:33+5:302017-10-04T01:40:48+5:30
घोडबंदर रोड या नव ठाणेकरांच्या कॉस्मोपॉलिटन पट्ट्यात १ व २ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ या उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठाणे : घोडबंदर रोड या नव ठाणेकरांच्या कॉस्मोपॉलिटन पट्ट्यात १ व २ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ या उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ३०० वाचकांनी भेट देऊन ५०० पुस्तकांची देवाण-घेवाण केली. अर्थात या ठिकाणी मुख्यत्वे इंग्रजी पुस्तकांना वाचकांची पसंती होती.
मे महिन्यात जुन्या ठाण्यात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात वाचकांनी मराठी पुस्तकांना पसंती दिली होती. घोडबंदर परिसरातील वाचकांचा मात्र इंग्रजी पुस्तकांकडे ओढा होता. अनेक अमराठी वाचकांनीही मेळाव्यास भेट दिली.
‘पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचीत जावे...’ या संकल्पनेवर आधारीत हा उपक्रम रविवार आणि सोमवारी ऋतूू एन्क्लेव्ह सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळील बाग, घोडबंदर रोड, ठाणे येथे राबविण्यात आला. मराठी, अमराठी ३०० वाचकांनी येथे भेट देऊन तब्बल ५०० पुस्तकांची देवाण घेवाण केली. या उपक्रमात मराठी, इंग्रजी, बालसाहित्य स्वीकारले जाणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार वाचकांनी पुस्तके आणली होती. घोडबंदरवासियांनी मराठी पुस्तके दिली आणि वाचायला इंग्रजी पुस्तके घेतली. या मेळाव्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतचे सर्व वाचक सहभागी झाले होते. फिक्शनकडे वाचकांचा अधिक ओढा असल्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त विनायक रानडे यांनी सांगितले.
रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचन चळवळीचा विस्तार भारत आणि त्याबाहेर झाला आहे. वाचनालयापासून दूर गेलेल्या वाचकाला पुस्तकाच्या जवळ आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ हा उपक्रम. प्रत्येक वाचकाकडे किमान पाच ते सहा पुस्तके असतातच. ती वाचून झाल्यावर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो अशा वाचकांना डोळ््यासमोर ठेवून रानडे यांनी पुस्तकाच्या देवाण घेवाणचा उपक्रम सुरू केला. नाशिकमध्ये प्रथम हा उपक्रम सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील २२ ठिकाणी हा उपक्रम राबविला गेला.
त्याला ११ हजार ५०० वाचकांनी भेट दिली तर २१ हजार पुस्तकांची देवाण घेवाण झाली. मे महिन्यात ठाण्यात प्रथमच हा उपक्रम राबविला गेला आणि दोन दिवसांत तब्बल दोन हजारांहून अधिक पुस्तकांची देवाण घेवाण झाली.
पाचशेहून अधिक वाचकांनी भेट दिली. यात इंग्रजी पुस्तकांना तरुणांचा तर ज्येष्ठ नागरिकांचा आध्यात्मिक, कथा - कादंबºयांना अधिक प्रतिसाद लाभला. महिलांनी आध्यात्मिक पुस्तके अधिक दिली. परंतु, घेताना विविध प्रकारांची पुस्तके घेतली होती.