डोंबिवलीसारख्या शहरात इंग्रजी शाळांचा मराठी शाळांना फटका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:37 AM2019-05-20T00:37:54+5:302019-05-20T00:37:57+5:30
वेगवेगळे सूर : महागडी फी व अभ्यास न झेपल्याने इंग्रजी शाळांचे विद्यार्थी माघारी, जाहिरातीचे युग असल्याने काहींनी लावले बॅनर, पालकांना माहिती व्हावी हाच उद्देश
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई, आयसीएसई, क्रें बीज परीक्षा बोर्ड असलेल्या शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असून मराठी शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे, अशी परिस्थिती नसल्याचा दावा मराठी माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी केला. काही मराठी शाळांनी प्रवेशाकरिता बॅनर लावल्याने मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वानवा असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र काही शाळांनी हा अपवाद असल्याचे मत व्यक्त केले. टिळकनगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर यांनी सांगितले की, सध्याचे युग हे जाहिरातीचे आहे. आमची शाळा सर्वसामान्यांना माहीत व्हावी याच उद्देशाने बॅनर लावला आहे. सध्या लोकवस्ती वाढली आहे. आजूबाजूच्या सोसायटीच्या गर्दीत शाळा दडून गेली आहे. शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. पालकांना आपल्या पाल्यावर चांगले संस्कार या शाळेत होतात अशी खात्री असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. लोकमान्य गुरूकुल ही शाळा आमच्या संस्थेने सुरु केली आहे. त्याला आंतरराष्ट्रीय महामंडळाची मान्यता मिळाल्याने येत्या जूनपासून संपूर्णपणे मराठी माध्यमाची ही शाळा सुरु होत आहे. यापूर्वी ही शाळा सेमी इंग्रजी होती. आपले सरकार देखील त्या बोर्डाच्या तोडीचा स्तर व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहे. डोंबिवलीत नव्याने वास्तव्याला आलेल्यांना शाळेची माहिती व्हावी म्हणून आम्ही बॅनर लावत असतो. उलटपक्षी सध्या इंग्रजी माध्यमाकडून पालक आणि विद्यार्थी मराठी माध्यमांकडे वळत आहेत. मागील वर्षी आमच्याकडे काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात प्रवेश घेतला होता. यंदाही ५ ते ६ विद्यार्थी मराठी माध्यमात आले आहेत. पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश इंग्रजी माध्यमात घेतात पण त्या विद्यार्थ्यांला ते झेपले नाही आणि खर्च परवडला नाही. तर ते पुन्हा मराठी माध्यमाकडे वळतात.
शाळेचे संस्थाचालक आशीर्वाद बोंद्रे यांच्या मते, मराठी माध्यमांच्या शाळामध्ये प्रवेशासंबंधी काही पूर्वग्रह पालकांच्या मनात आहेत. एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम कमी दर्जाचा आहे. मराठी शाळांमध्ये सुविधा नाहीत, या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान कच्चे असते. या शाळांमधील वातावरण गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सक्षम नाही. पण या पालकांना याची कल्पना नाही की, एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमात स्वागतार्ह बदल झाला आहे. हा अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाच्या समकक्ष आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेकडे लक्ष पुरवल्यास त्यांचे ज्ञान हे इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच असू शकते. व्याकरणाच्या दृष्टीने मराठी शाळेतील मुले इंग्रजी शाळेतील मुलांपेक्षा अधिक प्रगत असतात. त्यासाठी केवळ शाळांनी त्यांना दैनंदिन इंग्रजीचा सराव देणे गरजेचे आहे. ज्या मराठी माध्यमाच्या शाळांनी कालानुरूप बदल केले व उत्तम दर्जाचे शिक्षण मराठी शाळेत मिळू शकते हे पालकांच्या मनात ठसवले त्या शाळांची प्रवेश संख्या वाढली आहे.
चंद्रकांत पाटकर विद्यालयाचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यपक विनय धात्रक यांनी माहिती दिली की, पूर्वी शाळा कमी होत्या आणि विद्यार्थी संख्या जास्त होती. आता शाळा वाढल्याने विद्यार्थी संख्या विभागली गेली. काही वर्षापूर्वी पालक इंग्रजी माध्यमांकडे वळत होते. मात्र आता ते पुन्हा मराठी माध्यमाकडे वळू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठी शाळांसाठी हे आशादायी चित्र आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थाचे कार्यवाहक दीपक कुलकर्णी यांनी सांगितले, आमच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या पश्चिमेतील दोन शाळांना विद्यार्थ्यांची संख्या ही समस्या नाही. आम्हाला अनेकांना प्रवेश नाकारावा लागतो. याउलट परिस्थिती स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या गोपाळनगर आणि दत्तनगर शाळेत आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमुळे माऊथ पब्लिसिटीवरच सर्व प्रवेश होतात. पश्चिमेतील विद्यार्थी पूर्वेच्या शाळेत येण्यास नकार देतात, असे त्यांनी सांगितले.
स.वा. जोशी शाळेचे संस्थाचालक डॉ. उल्हास कोल्हटकर म्हणाले की, सर्व ज्ञान हे इंग्रजी भाषेतून उपलब्ध झाल्याने पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे वाढला. मराठी माध्यमाच्या शाळेची फी कमी असते त्यामुळे त्यांना चांगल्या सोयीसुविधा देणे शक्य होत नाही. आमच्या संस्थेने सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा सुरू केली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधा मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना न मिळाल्यास त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना इमारतीच्या नुतनीकरणासाठी आवाहन केले आहे. शाळेची इमारत, प्रयोगशाळा सर्व अद्यावत सुविधा विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मराठी शाळेत निम्न स्तरातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पुन्हा एकदा मातृभाषेतून शिक्षण द्या, असा डंका वाजू लागल्याने विद्यार्थी येतील. फक्त सर्वच मराठी शाळांनी आपले इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्याची गरज आहे. आम्ही विद्यार्थ्यांना खेळणीघर, ग्रंथालय, संगणक अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.