ठाण्यातील इंग्रजीचे शिक्षक सात वर्षांपासून उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 02:38 AM2017-09-05T02:38:17+5:302017-09-05T02:38:37+5:30
स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावरील ठाणे शहरातील मनपा शाळांतील इंग्रजी माध्यमाचे शिक्षक सात वर्षांपासून केवळ सहा हजार रुपयांवर काम करत आहेत.
ठाणे : स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावरील ठाणे शहरातील मनपा शाळांतील इंग्रजी माध्यमाचे शिक्षक सात वर्षांपासून केवळ सहा हजार रुपयांवर काम करत आहेत. या शिक्षकांना तीन वर्षांमध्ये कायम करणे अपेक्षित असतानाही त्यांना उपेक्षित ठेवले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या शिक्षकांनी सोमवारी एकत्र येऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे आपली व्यथा कथन केली.
ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमातील या १६ शिक्षकांना मागील सहा ते सात वर्षांपासून कमीतकमी तीन हजार व जास्तीतजास्त केवळ सहा हजार रुपयांवर दरमहा काम करावे लागत आहे. शासन निर्णयानुसार या शिक्षकांना तीन वर्षांनी सेवेत कायम करून नियमित वेतनश्रेणी देण्याची तरतूद आहे. तसा महापालिकेने २०१३ मध्ये ठरावही घेतला आहे. मात्र, त्यांना अद्यापही कायम न केल्यामुळे हाल होत असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
प्रशासनाकडून वेळोवेळी विविध कारणे देऊन बोळवण केली जात आहे. महागाईला तोंड देत असताना घराचे भाडे देणेही कठीण झाले आहे. कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून असलेला हा शिक्षकवर्ग आर्थिक चक्र व्यूहात सापडला आहे.