इव्हेंट, प्रसिद्धीपेक्षा साधनेतून कलेचा आनंद घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:57 AM2018-01-16T00:57:41+5:302018-01-16T00:57:41+5:30
वयाच्या चाळिशीच्या आत आजच्या नवोदित कलाकारांना झटपट नाव, पैसा, प्रसिद्धी मिळते. मात्र, हे सर्व मिळणे म्हणजे एक प्रकारचा धोका आहे
ठाणे : वयाच्या चाळिशीच्या आत आजच्या नवोदित कलाकारांना झटपट नाव, पैसा, प्रसिद्धी मिळते. मात्र, हे सर्व मिळणे म्हणजे एक प्रकारचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवावे. इव्हेंट आणि प्रसिद्धीच्या मागे न पळता आपल्याला स्वत:ला निखळ आनंद मिळेल, इतकी साधना करावी आणि सतत नवीन शिकत राहावे, असा सल्ला प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांनी दिला.
सरस्वती शाळेच्या पटांगणात सुरू असलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत रविवारी आशा खाडिलकर यांची मुलाखत रंगली. गेले सात दिवस सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचा सुरेल समारोप झाला. कीर्ती आगाशे यांनी त्यांना बोलते केले. वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्या संगीत मैफलीत मी गायले. त्यात प्रथम क्रमांक आला. त्यानंतर, संगीत क्षेत्रात जी भरारी घेतली, त्याचे श्रेय माझे सर्व गुरू आणि आईवडील, त्यांचे संस्कार, दिग्गजांचा आशीर्वाद आणि रसिकांची दाद याचे आहे. दहावी इयत्तेत शिकत असताना स्पर्धेत पहिल्या क्र मांकाने विजयी ठरल्यावर भीमसेन जोशी यांनी दिलेला मोलाचा सल्ला आणि हिराबाई बडोदेकर यांनी दिलेली तानपुºयाची भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. अभिषेकी बुवांना कधी गाण्यांना चाली शोधत बसावे लागले नाही. हल्ली संगीतकारांना चाली शोधत बसाव्या लागतात. कधी कधी पंचवीसएक चाली लावतात, असा अनुभवही त्यांनी सांगितला.
हल्ली टीव्ही चालू केला की, त्यावर आपल्याला ठरावीक तीच गाणी, तीच नृत्ये पाहायला मिळतात. टाळ्या कशाला मिळतात, हे माहीत झाल्यावर तेचतेच लोकांसमोर आणले जाते. रसिकांना नवीन काही द्यावं हे गायकांनाही वाटत नाही. मात्र, कलावंतांनी असे करू नये. नवीन शिकावं, रसिकांसमोर नवनवीन कला सादर करावी, प्रयोगशील असावे, असा संदेश खाडिलकर यांनी दिला. नरवर कृष्णा समान, विलोपले मधुमिलनात या... अशी गाणी सादर करत त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. तर, अमृताहूनी गोड... या भक्तिगीताने मुलाखतीचा सुरेल समारोप झाला. या वेळी आमदार संजय केळकर, समितीचे शरद पुरोहित उपस्थित होते.