ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद घ्या; पण अंतरावरूनच! सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर
By सुरेश लोखंडे | Published: August 3, 2023 09:18 PM2023-08-03T21:18:23+5:302023-08-03T21:18:30+5:30
पर्यटनाच आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर
ठाणे : जिल्ह्यातील धोक्याच्या ठिकाणांवरील धबधबे, नदीचा प्रवाह, डोंगर कडे आदी ठिकाणांपासून एक किलो मीटर अंतरावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येत नव्हता. पण आता ही अट काही अंशी शिथील करून या ठिकाणाजवळ पर्यटकांना जाता येईल. पाण्यात उतरता येणार नाही. तेथील स्थितीचा आंदाज घेऊन स्थानिक प्रशासनाने,पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षेची उपाययोजना करावी, असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आज जारी केले आहे.
जिल्ह्यातील डोंगर, माळरानावर सध्याच्या पावसाने नदी,नाले, धबधबे जोरात वाहत आहेत. मात्र या स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यापासून तब्बल एक किमी. अंतरावर बंदी घातली होती. त्यामुळे पर्यटकांना या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नव्हता. तो घेता यावा. यासाठी अटी शिथील करण्याच्या मागणीचे निवेदने जिल्ह्याभरातून आले होते. त्यास विचारात घेऊन पर्यटकांना जवळजाऊन आनंद घेता यावा, पण त्यांच्या सुरक्षेला महत्त्व देत स्थानिक प्रशासनाने तेथील स्थिती लक्षात घेऊन सुरक्षेचा बंदोबस्त करावा, असे निर्देश देण्यात आल्याचे शिनगारे यांनी लोकमतला सांगितले.
सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धबधबे व नद्यांच्या पाण्याचा वेग वाढलेला आहे. त्यापासून जीवित हानी झाल्याच्या घटना आधी घडलेल्या आहेत. त्यास विचारात घेऊन या ठिकाणांच्या अगदी जवळ पर्यटकांनी जाऊ नये. वाहत्या पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. याशिवाय पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन पोलिस व स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेव्यात,असेही शिनगारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पर्यटकांनी या पर्यटन स्थळांचा आनंद घेताना सुरक्षेची काळजी स्वतःही घेणे गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.