निसर्गातील पानाफुलांप्रमाणे आपले आयुष्य बहरून टाका- नरेश म्हस्के
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 01:09 AM2020-01-11T01:09:48+5:302020-01-11T01:09:54+5:30
आनंद देणारे एकमेव प्रदर्शन असल्याचे सांगतानाच माणसाने निसर्गातील पानाफुलांप्रमाणे आपले आयुष्य बहरून टाकावे, असे मत महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
ठाणे : सांगीतिक थीमवर आधारित असलेले बारावे ‘वृक्षवल्ली २०२०’ हे प्रदर्शन ठाणेकरांना आल्हाददायक, आनंद देणारे एकमेव प्रदर्शन असल्याचे सांगतानाच माणसाने निसर्गातील पानाफुलांप्रमाणे आपले आयुष्य बहरून टाकावे, असे मत महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी व्यक्त केले. नागरी क्षेत्रातील झाडांचे जतन व्हावे, वृक्षलागवडीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, म्हणून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या वृक्षवल्ली या प्रदर्शनाचे उद्घाटन म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाण्याच्या रेमण्ड कंपनीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती मंगल कळंबे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य व पालिका अधिकारी उपस्थित
होते.
पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल, तर वृक्षलागवडीबरोबरच अशा वृक्ष प्रदर्शनाचे आयोजन करणे गरजेचे आहे. ठाणे महापालिका सातत्याने हे प्रदर्शन आयोजित करत आहे. उद्यान विभागाकडे कमी कर्मचारीवर्ग असूनदेखील या विभागाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
प्राधिकरणाच्या माध्यमातून महापालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या झाडांचे संरक्षण व जतन करणे, दर पाच वर्षांनी वृक्षगणना करणे, वृक्षारोपण करणाºया व्यक्तींना रोपवाटिकेद्वारे रोपं उपलब्ध करून देणे, शहरातील मोकळ्या आणि मोक्याच्या जागी, रस्त्यांलगत, उद्यानांच्या बाजूला, टेकडीवर वृक्षारोपण करून शहरवासीयांना मोकळा श्वास मिळावा आणि हरित ठाण्याची संकल्पना सार्थ ठरावी, यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने ‘वृक्षवल्ली’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी रेमण्ड सर्कलपासून ते रेमण्ड मैदानापर्यंत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या सर्व शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी होते.
>स्पर्धेत ४५ स्टॉलधारकांसह १०० स्पर्धकांनी नोंदविला सहभाग
या प्रदर्शनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ४५ स्टॉल्सधारकांसह १०० वैयक्तिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. हे प्रदर्शन १० जानेवारी ते १२ जानेवारीदरम्यान सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.