पावसात भिजत सुटीचा आनंद : अनेक मंडळांचा सामाजिक संदेशांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:42 AM2017-08-28T04:42:12+5:302017-08-28T04:42:25+5:30
दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर रविवारी गणेशभक्तांनी येऊनजाऊन असणा-या पावसात भिजत सार्वजनिक मंडळांनी साकारलेल्या संदेशात्मक देखावे पाहिले.
ठाणे : दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर रविवारी गणेशभक्तांनी येऊनजाऊन असणा-या पावसात भिजत सार्वजनिक मंडळांनी साकारलेल्या संदेशात्मक देखावे पाहिले.
ठाण्यात गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उभारल्या जाणाºया देखाव्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली असली तरी ठराविक मंडळे मात्र अविरतपणे विविध विषयांवर आकर्षक आणि संदेशात्मक देखावे उभारतात. ते पाहण्यासाठी गणेशोत्सवात आलेल्या सलग सुट्टयांमधील आजचा शेवटचा दिवस सत्कारणी लावला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांनी सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे उभारले आहेत. एका मंडळाने मंदिरातील गाभारे, तर कुणी पारंपारिक राजमहल, शिशमहल उभारून बाप्पाचा शाही थाट केला आहे. अनेक मंडळांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा, पाणी जीवन आहे, जपून वापरा, निसर्गाचा ºहास करू नका’ या विषयावरील देखावे उभारून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यावर भर दिला आहे. त्यातही कुणी गणेश मंडपातच कुंडीमध्येच छोटी रोपे लावून स्वत:पासून त्याची सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेतील गणेशोत्सवात ‘स्मार्ट सिटी’चा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे.
ठाण्यातील एका मंडळाने मात्र ‘स्मार्ट सिटी’ या विषयावर भर देत त्याअंतर्गत आपण जेव्हा स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहतो तेव्हा शहरातील शिल्लक असलेल्या प्रमुख समस्या दाखवून त्या प्राधान्याने सुटाव्या, सोडवाव्या याकडे लक्ष वेधले आहे. साधारण १०-१२ मिनिटाचा तो देखावा आहे.
एका मंडळाने ‘शर्यत रे आपुली’ या विषयाच्या माध्यमातून आजच्या स्पर्धात्मक युगात माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कायम विविध कारणास्तव धावत असतो. तो शांत नसतोच. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी त्याची शर्यत सुरू असते, हे सुमारे १० मिनिटांत दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. देखाव्याबरोबरच मंडपातील आकर्षक रोषणाई लक्षवेधी ठरत होती. देखावे पाहत अनेक जण त्याचे फोटो काढण्यात दंग होते.