महिलांंसाठी लवकरच वाढीव डबे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:21 PM2018-12-10T23:21:03+5:302018-12-10T23:21:27+5:30
मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या महिला रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत लोकलमधील महिलांचे डबे अपुरे पडत आहेत.
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या महिला रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत लोकलमधील महिलांचे डबे अपुरे पडत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय सहव्यवस्थापक विद्याधर मालेगावकर यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले. त्यावर लवकरच महिला प्रवाशांसाठी लोकलचे पहिले तीन डबे राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
डोंबिवलीतून महिला विशेष लोकल सोडण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळातील तपासे, प्रसन्न आचलकर यांनी डोंबिवली स्थानक प्रबंधकांकडे केली होती. त्यावर त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करावी, असा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी मालेगावकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आदी स्थानकांमधील समस्यांचे निवेदन दिले.
चर्चेदरम्यान मालेगावकर म्हणाले, ‘सध्या मध्य रेल्वेवर दररोज लोकलच्या एक हजार ७७४ फेºया होतात. सरासरी ३-४ मिनिटांना एक लोकल धावते. पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याशिवाय जादा लोकल सोडणे शक्य नाही. पण २०१९ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होऊन तांत्रिक चाचण्या व तपासण्या केल्या जातील. त्यामुळे आणखी काही महिने मात्र गैरसोय होण्याची शक्यता आहे.’
‘दरवर्षी लाखोंच्या संख्येने प्रवासी वाढत आहेत. अनेक कार्यालयांतील नोकरीच्या वेळा सारख्या आहेत. त्यामुळे गर्दीत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या स्तरावर ठोस निर्णय होणे आवश्यक आहे. गर्दीची विभागणी झाल्यास काहीसा दिलासा मिळू शकेल. महिलांसाठी लोकलमधील पहिले तीन डबे राखीव ठेवण्यासंदर्भात वेगाने हालचाली सुरू आहेत. हा निर्णय झाल्यास महिला प्रवाशांना दिलासा मिळेल,’ असे मालेगावकर पुढे म्हणाल्याचे तपासे यांनी सांगितले.