ठाण्यात नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह ओसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:36 AM2019-04-07T00:36:05+5:302019-04-07T00:45:27+5:30

नागरिकांचा अल्प प्रतिसाद : चित्ररथांदरम्यान अंतर पडल्याने यात्रा रेंगाळली, तरुणाई मात्र सेल्फीत दंग

The enthusiasm of the new year's reception in Thane went down | ठाण्यात नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह ओसरला

ठाण्यात नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह ओसरला

Next

ठाणे : भारतीय नववर्ष स्वागतयात्रेला दरवर्षीपेक्षा यंदा ठाणेकरांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे तिचा उत्साह ओसरल्याचे दिसून आले. दोन चित्ररथांदरम्यान अंतर पडल्याने ती मध्येच रेंगाळलेली, तर मध्येच चित्ररथांच्या पळवापळवीने गाजली. त्यामुळे बघायला गर्दी केलेल्या तरुणाईचाही उत्साह मावळल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे भारतीय नववर्षाचे स्वागत करायला राममारुती रोड, गोखले रोड येथे गर्दी केलेली तरुणाई मात्र, सेल्फी काढण्यात दंग झाली होती.


श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागतयात्रा शनिवारी पार पडली. सकाळी ७ वाजता मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. तेथून मंदिरात आल्यावर पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी पंचांगवाचन करून श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे पूजन केले आणि तेथून पालखीचे प्रस्थान झाले. सुरुवातीला पालखीचे भोई पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शिंदे, आमदार संजय केळकर, स्वागताध्यक्ष सुहास मेहता झाले होते. त्यानंतर, रंगोत्सव बापूजी गुप्ते चौक येथून स्वागतयात्रेस सुरुवात झाली.


ठाण्यातील वर्षानुवर्षे परंपरा असलेल्या राजमार्गावरून यंदाही स्वागतयात्रा काढण्यात आली. त्यामुळे ती गोखले रोड यामार्गे पुढे निघाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक यांनीदेखील पालखीचे भोई होण्याची संधी सोडली नाही.


कल्याण : कल्याण संस्कृती मंच व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ‘देश माझा, मी देशाचा’ ही थीम होती. त्यामुळे या स्वागतयात्रेत देशभक्तीचे दर्शन घडले. सिंडिकेट येथील चौकात माजी एअर मार्शल घन:श्याम गुप्ता यांच्या हस्ते गुढी उभारून तिचे विधिवत पूजन करण्यात आले. या पूजनानंतर नववर्ष स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. भाजप आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रभाकर संत, सॅटर्डे क्लबचे दत्ता गोखले व कल्याण संस्कृती मंचाचे सचिव श्रीराम देशपांडे उपस्थित होते.


देशभक्तीची थीम असल्याने शाळकरी मुलांनी सैनिकी वेशात यात्रेत स्केटिंग केले. एका शाळकरी मुलीने भारतमातेची वेशभूषा केली होती. शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला बालशिवाजी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. रेल चाइल्ड सरस्वती विद्यामंदिरतर्फे यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनी नऊवारी साड्या, फेटे परिधान करून बाइक रॅली काढली होती. सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळास १२५ वर्षे झाल्याने त्यांचा एक रथ स्वागतयात्रेत सहभागी झाला होता. ‘कॅन्सर जनजागृती, पाणी वाचवा’ याविषयी जनजागृती करण्यात आली.

यात्रेच्या प्रारंभीच सनईचौघड्याचे मंगल वादन सुरू होते. बैलगाड्या, रथ, घोडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गणेश मित्र मंडळाने यात्रेचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. पंचकोषाधारित गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके केली. शिवाजी चौकापासून ढोलताशा पथके यात्रेत सहभागी झाली. संस्कृती ढोलताशा पथकाने यात्रेला सलामी दिली. ‘शलाका’ या युथ ग्रुपने यात्रेदरम्यान कचरा गोळा करून स्वच्छतेचा संदेश दिला. पुण्याच्या संस्थेने ‘भिकारीमुक्त शहर’असा संदेश दिला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच् चित्ररथ कमी होते.

Web Title: The enthusiasm of the new year's reception in Thane went down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.