ठाणेकरांमध्ये खरेदीचा उत्साह, बाजारपेठेत वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 03:04 AM2018-11-05T03:04:52+5:302018-11-05T03:09:35+5:30
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेला दिवाळीच्या खरेदीचा उत्साह या आठवडाअखेरीस शिगेला पोहोचला होता. दिवाळीची लगबग १५ दिवसांपासून सुरू होती. या दोन दिवसांचा मुहूर्त साधत चाकरमान्यांनी उरलीसुरली सर्व खरेदी एकदाची उरकून घेतली.
ठाणे - गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेला दिवाळीच्या खरेदीचा उत्साह या आठवडाअखेरीस शिगेला पोहोचला होता. दिवाळीची लगबग १५ दिवसांपासून सुरू होती. या दोन दिवसांचा मुहूर्त साधत चाकरमान्यांनी उरलीसुरली सर्व खरेदी एकदाची उरकून घेतली. बाजारपेठेत गर्दीचा महापूर आणि मोठी वाहतूककोंडी होती; पण तरीही सणाचा उत्साह ठाणेकरांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
नवरात्रीनंतर लगेचच सुरुवात झाली, ती दिवाळीच्या तयारीला. सर्वात आधी बाजारपेठा सजल्या, त्या रंगीबेरंगी आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्या, रंगीबेरंगी रांगोळ्या, चवदार फराळांनी आणि फटाक्यांनी; दुसरीकडे सुरुवात झाली, ती घरातील साफसफाईला. घरात अडगळ ठरणाºया वस्तू टाकून देऊन घर टापटीप ठेवण्याकडे गृहिणींचा कटाक्ष होता. कंदील, पणती, रांगोळ्यांची खरेदी करणे, फराळाच्या आॅर्डर्स देणे, याची घराघरांत लगबग सुरू होती. घर रंगवण्यापासून घर स्वच्छ ठेवण्यापर्यंत सगळ्यांचीच जय्यत तयारी सुरू होती. नवीन कपड्यांची खरेदीही सुरू होती. सुटी मिळेल, तशी घरातील मंडळी कपडेखरेदीसाठी जात होती. साड्या, ड्रेस, शर्ट-पॅण्ट, धोतर, पारंपरिक पोशाख अशी प्रत्येकाच्या निवडीनुसार खरेदी सुरू होती. बाजारपेठांप्रमाणेच मॉल्समध्येही तोबा गर्दी होती.
रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरूच
फराळाच्या कच्च्या मालासाठी धान्य भांडार, किराणा माल, जनरल स्टोअर्स सगळीकडे तुफान गर्दी होती. प्रत्येक रविवार छोट्या दुकानांपासून मोठ्या दुकानांपर्यंत गर्दीचा होता. त्यामुळे दुकानदारांनी कामगारांच्या सुट्या रद्द केल्या होत्या.
रात्री १० वाजता बंद होणारी दुकाने ही दिवाळीच्या काही दिवस आधी उशिरापर्यंत सुरू ठेवली होती. रस्त्याच्या कडेला ग्रामीण भागातून आलेले विक्रेते बसले होते. स्टेशन रोडपासून जांभळीनाक्यापर्यंतचा संपूर्ण रस्ता गर्दीने फुलला होता.