मतदार रुसला तरी तरुणाई उत्साही

By admin | Published: November 2, 2015 02:03 AM2015-11-02T02:03:02+5:302015-11-02T02:03:02+5:30

कल्याण-डोंबिवलीमधील मतदारांना मुख्यमंत्र्यांनी दाखवलेले साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजचे लॉलीपॉप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

The enthusiastic enthusiasm of the voters is rushing | मतदार रुसला तरी तरुणाई उत्साही

मतदार रुसला तरी तरुणाई उत्साही

Next

अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवलीमधील मतदारांना मुख्यमंत्र्यांनी दाखवलेले साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजचे लॉलीपॉप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रंगलेली वाकयुद्धाची जुगलबंदी आणि निवडणूक आयोगाने मतांचा टक्का वाढवण्याकरिता केलेला प्रचार या साऱ्या प्रयत्नांनंतरही मतदार राजाच्या रुसव्यामुळे मतांचा टक्का फारसा वाढला नाही. मात्र तरुणाईने रांगा लावून मतदान केले तर बुजुर्गांनी मतदानाचा परिपाठ कायम ठेवला.
राज्यातील सत्तेत भागीदार असलेले भाजपा-शिवसेना हे पक्ष वेगवेगळे लढल्याने निवडणुकीत रंग भरला गेला. मुख्यमंत्र्यांनी विकासाचे भलेमोठे पॅकेज जाहीर केले होते. शिवसेनेने विकास आम्हीच केला व करु शकतो, असा दावा केला होता तर मनसेने नाशिकप्रमाणे विकास करण्याचा शब्द दिला होता. दिवसभर मतदानाच्या रांगेत भेटलेल्यांपैकी कुणी कोणत्या मुद्द्याकरिता मतदान केले हे गुलदस्त्यात असले तरी निम्म्याहून अधिक मतदारांनी घरी बसणे पसंत केले.
रविवारी सकाळी बाजारहाट करायला बाहेर पडलेल्या बुजुर्गांनी रांगा लावून मतदानही केले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा समावेश होता. दहाच्या सुमारास तरुणाई रस्त्यावर उतरली. मतदान करा आणि फोटो काढून पाठवा, असे आवाहन काही वाहिन्यांनी केले असल्याने तरुण-तरुणी फोटो अथवा सेल्फी काढत होते. दुपारी उन्हाचे चटके बसू लागल्यावर मतदान केंद्रावरील गर्दी रोडावली. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते अस्वस्थ झाले. सोसायट्यांमध्ये जाऊन बेल वाजवून तुम्ही मतदान केले का? अशी विचारणा कार्यकर्ते करु लागले. त्या कार्यकर्त्यांना काही ठिकाणी बंद दरवाजे पाहून परतावे लागले. दुपारनंतर पुन्हा मतदार घराबाहेर पडल्याने उमेदवारांचे चिंताक्रांत चेहरे उजळले. मतदानाची आकडेवारी गतवेळेपेक्षा खाली घसरणार नाही, याची त्यांना खात्री पटली. याबाबत एका कार्यकर्त्याने मार्मीक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, बहुतांशी सर्वच वॉर्डांमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांकडून कोट्यवधींची उधळण गेल्या काही दिवसात झालेली असतांनाही त्याचे रुपांतर मतदानाच्या टक्का वृद्धीमध्ये झाले नाही तर तो निश्चित चिंतेचा विषय आहे. मतदानाकडे पाठ फिरवलेल्या एका नागरिकाला त्याबाबत विचारले असता तो म्हणाला की, शहरांतर्गंत समस्यांना आम्ही कंटाळलो असून कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी काही करणार नाही. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप व कार्यकर्त्यांच्या हाणामाऱ्या पाहिल्याने आम्हाला उबग आला.
काही मतदार पक्षाच्या टेबलांभोवती उभे राहून मतदार यादीतील नावे शोधत होते. मतदानाच्या स्लीप मिळाल्या नाहीत आणि यादीत शोधून नाव सापडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही मतदान करता येत नाही, अशी तक्रार त्यांनी केली. अर्थात मतदार यादीत आपले नाव आहे किंवा कसे याची खातरजमा वेळीच न केल्याचा हा परिणाम होता. डोंबिवलीतील पूर्व-पश्चिम येथील एकूण ३८ वॉर्डांमध्ये अनेक मतदार यादीत नाव नसल्याने मतदान न करता माघारी गेले. पूर्वेच्या शिवमार्केट, टिळक नगर, सावरकर रोड, तुकाराम नगर, दत्तनगर, सुनिल नगर, गांधीनगर, पाथर्ली, गोग्रासवाडी, अंबिकानगर, चोळेगाव यासह पश्चिमेच्या विष्णूनगर, दिनदयाळ रोड, कोपर, जुनी डोंबिवली, महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसायटी, जयहिंद कॉलनी, भागशाळा मैदान, नवापाडा आदी भागात मतदारांची मतदानाची संधी हुकली. कल्याण पूर्व-पश्चिमसह मांडा-टिटवाळा परिसरातही असेच घडले. मात्र डोंबिवलीत केवळ संगीतावाडी, आयरे रोड यासह कोपरगाव, रामनगरचा, म्हात्रे नगर या भागात मतदारांमध्ये तुलनेने उत्साह अधिक होता.
जेथे झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी मात्र, मतदानाचा जोर चांगला होता. सकाळी साडेआठ ते बारा आणि दुपारी दोन ते संध्याकाळपर्यंत तेथील बूथवर उत्साह दिसून आला. अनेकांनी कोणता उमेदवार जास्त बडदास्त ठेवतो त्याला झुकते माप द्यायचे असा पवित्रा घेतल्याने सर्वांमध्येच चढाओढ दिसून आली.

Web Title: The enthusiastic enthusiasm of the voters is rushing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.