भिवंडीत टोरंट पावरविरोधातील एकता संमेलनास नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद!
By नितीन पंडित | Published: August 15, 2023 05:59 PM2023-08-15T17:59:29+5:302023-08-15T17:59:53+5:30
शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील खंडू पाडा रोड वरील बागे फिरदोस मार्केटच्या समोर टोरंट पावर कंपनी विरोधात भव्य एकता संमेलनाचे आयोजन मंगळवारी दुपारी करण्यात आले होते.
भिवंडी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनी विरोधात स्वातंत्र्यदिनी चले जाव चा नारा देण्यात आला. टोरंट अत्याचार विरोधी जनसंघर्ष समितीचे संयोजक अॅड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील खंडू पाडा रोड वरील बागे फिरदोस मार्केटच्या समोर टोरंट पावर कंपनी विरोधात भव्य एकता संमेलनाचे आयोजन मंगळवारी दुपारी करण्यात आले होते.
या एकता संमेलनात शहर व ग्रामीण भागातील शेकडो महिला व पुरुष तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना आदरांजली वाहून व देशभक्तीच्या गीतांनी व घोषणांनी आंदोलकांनी परिसर दुमदुमून सोडला होता.तर प्रबोधनात्मक गीत व टोरंट पावर विरोधातील गाणे गाऊन टोरंट पावर चले जाव चा नारा यावेळी आंदोलकांनी दिली.
ही लढाई सर्व जाती धर्माच्या सर्व भाषिक नागरिकांच्या हक्काची लढाई असून टोरेंट पॉवर कंपनी विरोधात जोपर्यंत टोरेंट पॉवर कंपनी भिवंडीतून हद्दपार होत नाही तोपर्यंत टोरंट अत्याचार विरोधी जन संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलने व न्यायालयीन लढाई लढून टोरांटला सळो की पळो करण्यात येईल. शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर भिवंडी ते विधान भवन पर्यंत लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलनाचे संयोजक एड. किरण चन्ने यांनी शासनाला दिला आहे.