पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली - शिरीष लाटकर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: June 15, 2020 04:43 PM2020-06-15T16:43:39+5:302020-06-15T16:57:17+5:30
पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली असे भावुक उद्गार शिरीष लाटकर यांनी काढले.
ठाणे : सुशांतच्या आत्महत्त्येची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आणि पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली. तो इतक्या टोकाचे पाऊल उचलणारा अभिनेता नव्हता, तो यशस्वी अभिनेता होता, त्याला मिळालेले यश हे सगळ्या गोष्टींवर मात करायला पुरेसे होते असे भावुक उद्गार ठाण्यातील मराठी- हिंदी मालिकांचे सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी काढले..
पवित्र रिशता या मालिकेचे संवाद लेखन लाटकर यांनी केले होते. या मालिकेच्या सेट वर पहिली भेट सुशांत सोबत मे 2009 मध्ये झाली होती. त्यांनतर मालिकेनिमित्ताने त्याला तीन ते चार वेळा भेटलो होतो. मराठी वातावरणातील ही मालिका होती. मराठी कलाकारांची मांदियाळी या मालिकेत होती. सुशांतच्या संवादात दोन ते तीन मराठी शब्द असत ते मी त्याला समजावून सांगायचो. एक बिहारी मुलगा हे शब्द खूप अभ्यासपूर्ण समजून घ्यायचा. तो त्या मराठी वातावरणातील मालिकेत संपूर्ण मिसळून गेला होता. तो मराठी वाटला होता अशी आठवण लाटकर यांनी पुढे बोलताना सांगितली. तो फोन करूनही संवाद समजून घ्यायचा. तो अतिशय नम्र, मोकळा अभिनेता होता हे मला त्याच्या वागण्यातून नेहमी जाणवत असे. मला त्याचे नेहमी कौतुक असे, नेहमी सकारात्मक वृत्तीचा, यश मिळूनही पाय जमीनीवर असलेला, गॉड फादर नसलेला सेल्फ मेड मॅन असलेला अभिनेता होता. नटांचे पडद्यावरचे आणि प्रत्यक्षातले हास्य हे वेगळे असते, पण तो मात्र निर्मळ मनाचा होता. त्याच्या चेहऱ्यावरील 'स्माईल'चे लाखो चाहते होते कारण त्याच्या चेहऱ्यावरचे 'स्माईल' हे मात्र निर्मळ होते असे लाटकर यांनी सांगितले. त्याच्या आठवणींना उजाळा देताना लाटकर म्हणाले की, सुशांतने दोन वर्षांनी पवित्र रिशता ही मालिका सोडली. त्यांनंतर अडीच वर्षे आमची भेट नव्हती. मी एका मालिकेसंदर्भात अंधेरी येथील कॉफीशॉपमध्ये बसलो होतो, त्यावेळी सुशांतचा 'काय पोछे' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता आणि तो मोठा स्टार झाला होता. थोड्यावेळाने त्या शॉपमध्ये सुशांत आला, मी त्याला पाहिले खरे पण त्याच्याकडे जायचे कसे हा प्रश्न होता थोड्यावेळाने त्याची नजर माझ्यावर गेली आणि तो अतीशय नम्रपणे माझ्याकडे येऊन 'क्या सर कैसे हो?' असे विचारत चार ते पाच मिनिटे गप्पा मारून तो ठेथजन निघाला आणि ती शेवटची भेट कायम स्मरणात राहिली.