उल्हासनगरच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराज अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 06:27 PM2021-02-18T18:27:43+5:302021-02-18T18:28:13+5:30
महापौर दालनांत याबाबत आज बैठक होऊन पालिका प्रशासनाला तसे आदेश महापौर लिलाबाई अशान यांनीं दिले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतुन तर महापौर लिलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव यांच्या प्रयत्नातून शहराच्या पूर्व व पश्चिम प्रवेशद्वार जवळ छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अश्वरूढ व पुर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे. महापौर दालनांत याबाबत आज बैठक होऊन पालिका प्रशासनाला तसे आदेश महापौर लिलाबाई अशान यांनीं दिले.
उल्हासनगर शांतीनगर येथील भव्य प्रवेशद्वार जवळ महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ तर पश्चिम मधील साई बाबा मंदिरा जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महापौर लिलाबाई अशान यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीला महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, आयुक्त डॉ राजा दयानिधी, शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान, सभागृहनेते भरत गंगोत्री, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, शिवसेना गटनेते रमेश चव्हाण यांच्यासह महापालिका अधिकारी, विविध पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी दोन्ही पुतळे उभारणीला मान्यता दिली असून याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी महापौरांनी महापालिका प्रशासनाला आदेश दिले.
दोन्ही महापुरुषांच्या पुतळा उभारणीला मान्यता दिल्याणानंतर, महापौर, उपमहापौर यांच्यासह अन्य पदाधिकारी व पक्षाच्या नेत्यांनी शहराच्या दोन्ही प्रवेशद्वाराची पाहणी केली. महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही महापुरुषांचे पुतळे उभे राहणार असल्याचा विश्वास शिवसेना उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी दिली.