प्रभाग हितासाठी नाही तर स्वयंम हितासाठी प्रवेश, आनंद परांजपे यांचा जगदाळे यांच्यावर आरोप

By अजित मांडके | Published: February 13, 2023 03:28 PM2023-02-13T15:28:08+5:302023-02-13T15:28:32+5:30

घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगदाळे यांना क्लस्टरचे जे अर्थकारण दाखविले असेल तेच त्यांना अधिक महत्वाचे वाटले असेल.

Entry not for ward interest but for self interest, Anand Paranjape's accusation against Jagdale | प्रभाग हितासाठी नाही तर स्वयंम हितासाठी प्रवेश, आनंद परांजपे यांचा जगदाळे यांच्यावर आरोप

प्रभाग हितासाठी नाही तर स्वयंम हितासाठी प्रवेश, आनंद परांजपे यांचा जगदाळे यांच्यावर आरोप

googlenewsNext

ठाणे :

घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगदाळे यांना क्लस्टरचे जे अर्थकारण दाखविले असेल तेच त्यांना अधिक महत्वाचे वाटले असेल. एका बाजूला शरद पवार यांनी त्यांना दिलेला मानसन्मान, पदे असताना जगदाळे यांनी ‘क्लस्टरचे अर्थकारण’ आपलेसे करुन पक्षांतर केले आहे. क्लस्टरमध्ये लोकांचा विकास करता-करता त्यांना स्वत:चाच “स्वयंविकास”देखील बांधकाम व्यावसायिक म्हणून करायचा असेल. म्हणूनच त्यांचे हे अर्थकारण त्यांना लखलाभ असो,  असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला.

हणमंत जगदाळे यांनी आपल्या तीन नगरसेवकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत आनंद परांजपे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आनंद परांजपे म्हणाले की, क्लस्टरचा विषय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचाच आहे. त्यांच्याच संकल्पनेतून क्लस्टर डेव्हलपमेंट या शब्दाचा जन्म झाला. त्यांनीच आपल्या सरकारच्या विरोधात मोर्चा काढून ही योजना राबविण्याचा आग्रह धरला होता. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना सिडकोसोबत सामंजस्य करार झाला, अशी माहिती आहे. संजीव जयस्वाल हे ठामपाचे आयुक्त असताना क्लस्टरचे ४४ यूआरपी जाहीर झाले. त्यामध्ये ६० हेक्टरवर शास्त्री नगर, सहकार नगर आणि लोकमान्य नगरमध्ये ही योजना राबविण्याचे गृहीत धरण्यात आले. एकदा शासनाने योजना जाहीर केल्यानंतर त्याभागातील नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे, यावर शासनाची योजना ठरत नसते. मग, तो राष्ट्रवादीचा असो, की शिवसेना-भाजपचा आहे; यावर शासनाचे धोरण ठरत नसते. त्यांनी जे वक्तव्य केले आहे की, क्लस्टरला अधिक गती देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचा हात हातात घेतला आहे. जगदाळे यांनी आपल्या भाषणात ते बांधकाम व्यावसायिक असल्याचे म्हणाले. त्यामुळे त्यांना एफएसआय, टीडीआर जास्त कळत असेल. क्लस्टरमध्ये लोकांचा विकास करता करता त्यांना स्वयंविकास देखील बांधकाम व्यावसायिक म्हणून करायचा असेल. याबद्दल बांधकाम व्यावसायिक म्हणून तेच सांगू शकतील. त्यांचे एसआरएचे अनेक प्रकल्प सुरु आहेत.
मध्यंतरी एका जागरुक ठाणेकराच्या माध्यमातून तसेच वृत्तपत्रातून समजले होते की येऊरमध्ये त्यांची २४ बंगल्यांची योजना सुरु आहे. त्या प्रकल्पाला वनखात्याने परवानगी दिलेली नाही. परंतु समितीच्या पुढील बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती आपणांसमोर येणारच आहे. पूर्वी, इकोसेन्सेटीव्ह झोन असल्याने त्याची परवानगी सीसीच्या वेळीच आणणे गरजेचे होते. आता ती प्लींथपर्यंत आणली तरी चालणार आहे. त्यामुळे हा एक प्रकल्पही मार्गी लागावा, अशी त्यांची मानसिकता असेल. असा आरोपचइ त्यांनी केला. 
शकुनी मामा हे आता ज्योतिषही बघतात का?
आपणाला माहित नव्हते की, शकुनी मामा यांचे महापौरपद गेल्यानंतर त्यांनी पार्टटाईम ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय सुरु केला आहे का असा सवाल त्यांनी केला. १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नियमित सुनावणी सुरु होत आहे. त्यामुळे हे १६ आमदार अपात्र ठरल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहितील का,; बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अस्तित्व राहिल का; वेळ अशी येईल का की त्यांना कमळाबाईमध्ये प्रवेश करुन आपली राजकीय वाटचाल करावी लागेल का;  हे भविष्य त्यांनी आधी बघावे असा टोलाही त्यांनी नरेश म्हस्के यांचे नाव न घेता लगावला.

उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व लादले, हा कांगावा
 उद्धव ठाकरे हे आपल्यावर लादलेले नेतृत्व आहे, असे शिंदेगटाकडून बोलले जात आहे, याबाबत विचारले असता आनंद परांजपे यांनी १९९६ सालचे एक छायाचित्र दाखवून, त्यात आपले वडील प्रकाश परांजपे हे खासदार म्हणून निवडून आलेे. त्यावेळी आनंद दिघे यांनी प्रकाश परांजपे यांना घेऊन मातोश्री गाठली होती. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्षही नसताना त्यांची भेट घेऊन सत्कार केला होता. म्हणजेच आनंद दिघे आणि प्रकाश परांजपे यांनीही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्यच केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे हेच आहेत, हे त्या पिढीतील या दोन्ही जणांनी मान्य केले होते. असे ते म्हणाले.

Web Title: Entry not for ward interest but for self interest, Anand Paranjape's accusation against Jagdale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.