उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले
By अजित मांडके | Published: March 4, 2024 11:29 AM2024-03-04T11:29:44+5:302024-03-04T11:31:50+5:30
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ठाणे : रायगड जिल्ह्यातील उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथे येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याअधिच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरल्यामुळे उबाठा गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे. आज आपल्या दौऱ्याची सुरुवात उरण येथून करण्यापूर्वीच उरण मधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.
यात उबाठा गटाचे नवघर पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, उलवे नोडचे शहर प्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे आणि युवासेनेचे क्षितिज शिंगरे यांचा समावेश होता.
राज्य सरकारच्या प्रयत्नांनी रायगड जिल्ह्याचा विकास होत असून नेरुळ ते उरण अशी उपनगरी रेल्वेसेवा नुकतीच सुरू झाली आहे. तसेच येत्या वर्षभरात पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील सुरू होत असून त्यामुळे अनेक संधी निर्माण होणार आहेत. या संधीचा स्थानिक नागरिकांनी सर्वाधिक फायदा घ्यावा असे मत यावेळी व्यक्त केले. कै. दी. बा. पाटील यांचेच नाव आपण या विमानतळाला देणार असून उरणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के हेदेखील उपस्थित होते.