हिरव्या देवाच्या यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:05 AM2024-06-10T11:05:07+5:302024-06-10T11:06:33+5:30
Environment: काही संघटना ५ जूनला पर्यावरणदिनी मुरबाड तालुक्यात एका अगळ्या वेगळ्या ‘हिरव्या देवाच्या यात्रे’त एकवटल्या होत्या. यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा याची लज्जत उपस्थितांनी चाखली.
- आमाेद काटदरे
(वरिष्ठ उपसंपादक)
जंगलात ७० ते ८० फुटांच्या उंच झाडांखाली २०-२५ फुटांपर्यंत वाढणारी करवंदाची जाळी किंवा तत्सम वनस्पतींच्या आच्छादनामुळे जंगलाचे रक्षण होत होते. हरीण, उदमांजर, रानडुकरे, विविध लहान पक्षी, बिबटेही अशा जाळ्यांमध्ये लपतात. हरीण आणि पक्ष्यांचे करवंदे हे खाद्य आहे. परंतु, शेतालगत करवंदाची जाळी असल्यास रानडुकरांमुळे होणारे शेतीचे नुकसान किंवा बिबट्याच्या हल्ल्याची भीती यांमुळे करवंदाच्या जाळ्यांची छाटणी होऊ लागली. पर्यावरणाचा हा ऱ्हास रोखण्यासाठी, उपाय शोधण्यासाठी काही संघटना ५ जूनला पर्यावरणदिनीमुरबाड तालुक्यात एका अगळ्या वेगळ्या ‘हिरव्या देवाच्या यात्रे’त एकवटल्या होत्या. यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा याची लज्जत उपस्थितांनी चाखली.
निसर्गाशी आपले कृतज्ञतेचे नाते दृढ व्हावे, पुढच्या पिढ्यांसाठी निसर्गाचा हा ठेवा टिकावा, वाढावा, याकरिता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी-जंगलवासी वनहक्कधारक गावे दरवर्षी पर्यावरणदिनी हिरव्या देवाची यात्रा साजरी करतात. आदिवासी आजही उपजीविकेसाठी जंगल, शेती, सभोवतालच्या पर्यावरणावर अवलंबून आहेत. झाडे, फुले, पाने, माती आदी ते गरजेपुरते वापरतात. परंतु, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली किंवा नफेखोरीच्या हव्यासाने आपण निसर्गातील जीवसृष्टीकडे बाजारू वृत्तीने पाहत आहोत. गरेजेपक्षा अधिक ओरबाडत आहोत. त्याला पायबंद बसावा आणि निसर्गाबाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी या यात्रेची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली. गेली ११ वर्षे विविध गावांत होणाऱ्या या अनोख्या यात्रेत आदिवासींबरोबरच शहरी मंडळीही सहभागी होत आहेत. ही यात्रा आता एका व्यापक चळवळीत रूपांतरित होऊ पाहतेय.
यंदाही ५ जूनला श्रमिक मुक्ती संघटना, वननिकेतन, अश्वमेध प्रतिष्ठान आणि ‘इन्टॅक’ ठाणे चॅप्टर यांच्या सहकार्याने ही यात्रा मुरबाडच्या मोहवाडी (वैशाखरे) येथे उत्साहात साजरी झाली. दरवर्षीप्रमाणे आदिवासी महिलांसाठी रानभाज्या संकलन, त्यांच्या पाककृती स्पर्धा, पारंपरिक नृत्येस्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. मात्र यंदाची यात्रा प्रामुख्याने ‘करवंद’ या संकल्पनेवर आधारित होती, अशी माहिती श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे आणि ‘अश्वमेध’चे अविनाश हरड यांनी दिली. जंगलातील वणवे आण कुंपणासाठी होणारी करवंदाच्या जाळ्यांची तोड, यामुळे खालच्या स्तरातील जंगल नाहीसे झाल्याने पर्यावरणाची हानी झाली. पर्यावरणाच्या पुनर्स्थापनेसाठी अशा वनस्पतींची आवश्यकता आहे. ५० वर्षांपूर्वी मानद वन्यजीव रक्षक लालू दुर्वे यांनी करवंदांच्या जाळ्या कमी होत असल्याने पर्यावरणाच्या बिघडणाऱ्या संतुलनाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
जांभळाएवढी करवंदं
मुरबाडमधील ऐतिहासिक सिद्धगड किल्ल्याच्या परिसरात जांभळाच्या आकाराएवढी करवंदे आढळतात. ती पिकल्यानंतरही हिरवीगार असतात. करवंदाच्या प्रजाती जतन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आदिवासी महिलांनी रानभाज्यांबरोबरच करवंदांचे अंबील, लोणचे, हिरव्या करवंदाची लसूण घालून केलेली भाजी, कढी, ठेचा, ज्यूस, अशा पौष्टिक पाककृती आणल्या होत्या. ज्यूस, लोणचे दीर्घकाळ टिकत असल्याने त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, याकडे आदिवासींचे लक्ष वेधण्यात आले. करवंदं तसेच काळू नदीवर आधारित सादर झालेली गाणी आणि लोकगीतांनी सर्वांचे मनोरंजन केले.