जागतिक पर्यावरण दिवशीच मीरा भाईंदर महापालिकेकडून पर्यावरणाचा ऱ्हास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 10:43 AM2020-06-06T10:43:03+5:302020-06-06T13:57:43+5:30
मीरा भाईंदर महापालिका आणि येथील बहुतांश लोकप्रतिनिधी, राजकारणी यांना पर्यावरणाचे नेहमीच वावडे राहिले आहे.
मीरारोड - शुक्रवारच्या जागतिक पर्यावरण दिवशी छाटणीच्या नावाखाली हिरवीगार लहानमोठी झाडे पार छाटून टाकण्याचा प्रकार मीरा भाईंदर महापालिकेने केला आहे. झाडांची छाटणी की वृक्ष तोड असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मीरा भाईंदर महापालिका आणि येथील बहुतांश लोकप्रतिनिधी, राजकारणी यांना पर्यावरणाचे नेहमीच वावडे राहिले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्तांपासून तत्कालीन आमदार, अधिकारी, ठेकेदार तसेच खाजगी लोकांवर पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हे दाखल आहेत.
शहरातील झाडांची अवास्तव कत्तल, मनमानी छाटणी तसेच झाडांच्या देखभाल कडे होणारी डोळेझाक देखील नेहमीच वादाचा मुद्दा ठरले आहेत. अनेक नगरसेवक तर झाडांच्या छाटणीचे मोठ्या कौतुकास्पद काम केल्या सारखेसेल्फी वा फोटो शेयर करत असतात.
शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिवस असून देखील महापालिकेने शहरात छाटणी चालवली होती. भाईंदरच्या बालाजी नगर मध्ये तर स्थायी समिती सभापती अशोक तिवारी यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छाटणी वेळचे फोटो पोज देऊन काढले. परंतु येथे छाटणी ऐवजी हिरवीगार लहान मोठी झाडेच मोठ्या प्रमाणात छाटून टाकण्यात आली. झाडांवरच्या पक्ष्यांच्या घरट्यांचा पण विचार केला गेला नाही. काही झाडांवर तर फांद्याच ठेवण्यात आल्या नाहीत इतकी छाटणी करून टाकण्यात आल्याने अनेक राहिवाश्यांनी संताप व्यक्त केला.
वास्तविक छाटणीसाठी काय निकष पाळायचे याचे हरित लवादाने आदेश दिले आहेत. परंतु त्याला सुद्धा पालिका आणि लोकप्रतिनिधींकडून हरताळ फासला जात आहे. जागतिक पर्यावरण दिवशीच झाडांची केलेली अशी तोड पाहून महापौर ज्योत्स्ना हसनाळे देखील संतापल्या. त्यांनी उद्यान विभागाचे अधिकारी नागेश वीरकर व हंसराज मेश्राम यांना अश्या प्रकारे छाटणी करू नका असे आदेश दिले.