इफेड्रीन प्रकरण: विकीची मिळणार माहिती अमेरिकन पोलिसांशी संपर्क; ममतावर गुन्हाच दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:50 AM2017-09-27T01:50:50+5:302017-09-27T01:51:07+5:30
सुमारे २६०० कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांना पाहिजे असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर विकी गोस्वामीसह इतर आरोपींची महत्वपूर्ण माहिती ठाणे पोलिसांना लवकरच दिली जाईल
- जितेंद्र कालेकर
ठाणे : सुमारे २६०० कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांना पाहिजे असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर विकी गोस्वामीसह इतर आरोपींची महत्वपूर्ण माहिती ठाणे पोलिसांना लवकरच दिली जाईल, असे आश्वासन अमेरिकन पोलिसांनी ठाणे पोलिसांना मंगळवारी दिले. दरम्यान, ठाणे पोलिसांना वान्टेड असलेली या गुन्हयातील एक आरोपी ममता कुलकर्णी हिच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल नसल्याचीही महत्त्वपूर्ण माहिती या अधिकाºयांनी दिली.
भारतासह आशियाई देशांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख असलेले अमेरिकन पोलीस अधिकारी मार्क फ्रेड्रीक यांनी नव्याने सूत्रे घेतल्यानंतर प्रथमच ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग तसेच
इफेड्रीन प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांची अनौपचारिक भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या गुन्हयासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण केली. सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी याची कथित पत्नी ममता कुलकर्णी हिच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची तसेच तिची संपत्तीही जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. इफेड्रीन अर्थात ‘इडी’ पावडरचा साठा सोलापुरातील एव्हॉन कंपनीतून जप्त झाला होता.
आतापर्यंत २६०० कोटींचे २३ टन अंमली पदार्थ या प्रकरणात जप्त केले गेले. अमेरिकन पोलिसांनी इफेड्रीन प्रकरणात अटक केलेला विकी गोस्वामी, केनियातील डॉ. अब्दुल्ला, पाकिस्तानातील आकाश ब्रदर्स यांच्याकडून कोणती माहिती मिळाली? तसेच यात आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का? अशी विचारणा या अधिकाºयांकडे ठाणे पोलिसांनी केली. अमेरिकेत विकी गोस्वामीसह त्याची टोळी कशा प्रकारे अमलीपदार्थांची तस्करी
करते, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.