इफेड्रिन प्रकरण :ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त होणार, अंधेरी येथे तीन प्रशस्त सदनिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:03 AM2017-11-04T02:03:09+5:302017-11-04T02:16:22+5:30

२००० कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने फरार घोषित केलेली ममता केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे.

Ephedrine Case: Mamta Kulkarni's assets will be seized, three spacious tenements in Andheri | इफेड्रिन प्रकरण :ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त होणार, अंधेरी येथे तीन प्रशस्त सदनिका

इफेड्रिन प्रकरण :ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त होणार, अंधेरी येथे तीन प्रशस्त सदनिका

Next

ठाणे : २००० कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने फरार घोषित केलेली ममता केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे.
१३ एप्रिल २०१६ रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून १२ लाख रुपयांचे इफेड्रिन जप्त केले होते. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून २ हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देशविदेशात तस्करी करणाºया रॅकेटचा भंडाफोड केला होता. अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हादेखील या प्रकरणात आरोपी आहे. एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये इफेड्रिनचे उत्पादन व्हायचे. कंपनीच्या भागीदारांच्या मदतीने हे इफेड्रिन केनिया येथे निर्यात केल्यानंतर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे अमलीपदार्थात रूपांतर केले जायचे. चौकशीसाठी पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठावठिकाणा मिळत नसल्याने तिला फरार घोषित करण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने तिला फरार घोषित केल्यानंतर पोलिसांनी तिच्या अंधेरी येथील निवासस्थानी नोटीस बजावली.
या नोटीसला तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, पुढील पायरी म्हणून पोलिसांनी तिची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी न्यायालयास मागितली होती. अमलीपदार्थविरोधी विशेष न्यायालयाचे न्या. एच.एम. पटवर्धन यांच्यापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या वेळी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पोलिसांची विनंती ग्राह्य धरून ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिली.

रेड कॉर्नर नोटीससाठी पाठपुरावा
ममताविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून केंद्रीय गुप्तचर खात्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ती केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे. रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर सर्व विमानतळांना संबंधित आरोपीबाबत सतर्क केले जाते. आरोपी कोणत्याही विमानतळावर आढळल्यास संबंधित पोलीस यंत्रणेला त्याबाबत कळवले जाते. रेड कॉर्नर नोटीससाठी आरोपपत्र दाखल करणे अनिवार्य असते. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्याने आता ममताविरुद्ध रेड कॉर्नर बजावण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विक्की गोस्वामीच्या नावे मालमत्ता नाही
ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती पोलिसांनी निबंधक कार्यालयाकडून मागवली होती. त्यानुसार, विक्की गोस्वामीच्या स्वत:च्या नावावर कोणतीही मालमत्ता नसल्याची माहिती निबंधक कार्यालयाने दिली.
ममता मुकुंद कुलकर्णीच्या नावे अंधेरीतील वर्सोवा येथे पाच मार्गांवर स्काय अँकरेज सोसायटीमध्ये पहिल्या, दुसºया आणि सातव्या माळ्यावर १०१, २०१ आणि ७०१ क्रमांकांच्या तीन प्रशस्त सदनिका आहेत. न्यायालयाने हिरवी झेंडी दिल्याने या सदनिका जप्त करण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.

Web Title: Ephedrine Case: Mamta Kulkarni's assets will be seized, three spacious tenements in Andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा