लोकवस्त्यांमधे स्वातंत्र्य दिनापासून समता विचार प्रसारक संस्था सुरू करणार वाचन - गायन कट्टे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 05:30 PM2019-08-13T17:30:40+5:302019-08-13T17:33:51+5:30
लोकवस्तीतील जीवन अधिक समृद्ध बनविण्याचा संकल्प समता विचार प्रसारक संस्थेने सुरु केला आहे.
ठाणे : ठाण्यातील लोक वस्त्यांमधून, प्रतिकूल परिस्थितीतीशी झगडणा-या जिद्दी एकलव्यांच्या माध्यमातून वस्तीपातळीवर वैचारीक व सांस्कृतिक पातळीवर अधीक समृद्ध जीवन विकसीत करण्याच्या उद्देशाने, समता विचार प्रसारक संस्था ठाण्यातील आठ लोकवस्त्यात वाचन व गायन कट्टा सुरू करणार असल्याची माहिती, संस्थेच्या नवनिर्वाचित सचिव साथी हर्षलता कदम यांनी एका पत्रकाद्वारे दिली. संस्थेच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सदर निर्णय एकमताने घेतल्याचे त्यांनी पुढे नमूद केले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे पुर्ननिर्वाचित कार्यकारी विश्वस्त आणि अध्यक्ष डाॅ. संजय मंगला गोपाळ हे होते. संस्थेने ठाण्यातील लोकवस्त्यांमधून शैक्षणिक कामाचा पुढचा टप्पा म्हणून वंचितांचा रंगमंच यशस्वीपणे राबविल्यावर आता वस्तीतील बाल - किशोर - युवा आणि प्रौढांमध्ये असणारी वाचनाची भूक भागविण्याकरीता व त्यांच्यात वैचारीक समृद्धता निर्माण होण्याकरिता आठ ठीकाणी फीरती वाचनालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या नव नवनिर्वाचित उपाध्यक्ष साथी मनिषा जोशी यांनी सांगितले. मनोरमा नगर, म. फुले नगर - कळवा, खारटन रोड, कोपरी, सावरकर नगर, रमाबाई आंबेडकर नगर, चिराग नगर, मानपाडा व कळवा येथील ठाणे महापालिका माध्यमिक शाळेत हा उपक्रम येत्या स्वातंत्र्य दिनापासून क्रमा क्रमाने सुरू होणार असून, श्रीमती भारती पाटणकर, यांच्या समवेत वस्तीतील एकलव्य कार्यकर्ते अजय भोसले, इनाॅक कोलियार, ओंकार जंगम आदी यासाठी मेहनत घेत आहेत.
गायन कट्टा म्हणजे दिवसभराचं काम आटोपून घरी परतल्यावर संगीताची आवड जोपासण्याचा वस्तीतील सामुहिक प्रयत्न, असे संस्थेच्या संस्थापक व नवनिर्वाचित एकलव्य योजना संयोजक साथी लतिका सु. मो. यांनी सांगितले. गायन कट्ट्यावर भजनं, अभंग, वारकरी संप्रदायातील गाण्यांपासून फील्मी, शाहिरी व चळवळीच्या गाण्यांपर्यतची गाणी गायली जावू शकतील. यातून जुगार, पत्ते आदी व्यसनात अडकण्याचे रस्ते बंद होवू शकतील, असंही त्या पुढे म्हणाल्या. या उपक्रमात आयपीएच च्या वैदेही भिडे यांचेही सहकार्य आणि वंचितांचा रंगमंचचे प्रणेते प्रसिद्ध साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे मार्गदर्शन असणार आहे.
संस्थेच्या नव्या पदाधिकारी व कार्यकारीणीची निवड
यावेळी पुढील तीन वर्षांसाठी संस्थेच्या कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यात एकलव्य विद्यार्थी कार्यकर्ते अनुजा लोहार सह - सचीव, सुनिल दिवेकर खजिनदार, अजय भोसले सह खजिनदार तर राहूल सोनार, प्रवीण खैरालिया, सुजीत भाल, निलेश दंत हे कार्यकारीणी सदस्य म्हणून निवडून आले. कल्पना भांडारकर, मीनल उत्तुरकर या अनुभवी कार्यकर्त्यांचीही कार्यकारीणीवर एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती संस्थेचे संस्थापक विश्वस्त व सदर निवडणूक अधिकारी साथी जगदीश खैरालिया यांनी जाहीर केले. संस्था चालविण्यात एकलव्य युवा, महिला व वंचित - शोषित - दलित समाजातील कार्यकर्ते यांचा या निमित्ताने पुढाकार वाढल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. संस्थेतर्फे बचत गट महिला सक्षमीकरण, एकलव्य युवा करीयर मार्गदर्शन, ध्येयनिश्चिती कार्यशाळा, २ ऑक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान खादी व ग्रामोद्योग वस्तू विक्री अभियान, अभिवाचन कला निपुणता आदी उपक्रम सुरू करण्याचे मनोगत संस्थेचे संस्थापक विश्वस्त साथी बिरपाल भाल यांनी यावेळी व्यक्त केले. बैठकीत सर्वांचे स्वागत पुर्व सचीव व रंगभूमीवरील कलाकार संजय निवंगुणे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुर्व उपाध्यक्ष कल्पना भांडारकर यांनी केले. बैठकीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साथी सुरेश बर्नवाल, शैलेष मोहिले, मंदार घोसाळकर आदी उपस्थित होते.