शिवाजी महाराजांचा उभारणार अश्वारुढ पुतळा; भाईंदर पालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:27 PM2020-01-01T22:27:32+5:302020-01-01T22:27:42+5:30
दोन कोटी ९५ लाखांचा येणार खर्च, घोडबंदर किल्ल्याची सध्या डागडुजी सुरू
मीरा रोड : घोडबंदर गावातील पुरातन घोडबंदर किल्ल्याकडे जाणारा रस्ता व शहरात प्रवेशासाठी बांधलेल्या नवीन ६० मीटर रस्त्याच्या नाक्यावर महामार्गाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. घोडबंदर किल्ल्याची डागडुजी सुरू असून मुख्य रस्त्यांच्या जंक्शनमध्येच आता भव्य पुतळा उभारला जाणार आहे.
मीरा-भार्इंदर शहराचे काशिमीरा नाका हे मध्य भागातील मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा खूप वर्षांपूर्वीच बसवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक असे या नाक्याचे नामकरण केले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असणाऱ्या या अश्वारूढ पुतळ्यासमोर आता महामार्गावरील उड्डाणपूल आला आहे. त्यामुळे शहरातील प्रवेशद्वारावर असणारा हा पुतळा उंच व सुशोभित करण्याची मागणी सातत्याने होत असून त्याचे काम प्रलंबित आहे. त्यातच मेट्रोचे काम सुरू झाल्याने भविष्यात या ठिकाणी पुतळ्याचे नियोजन योग्यपणे करावे लागणार आहे.
दरम्यान, घोडबंदर किल्ल्याच्या डागडुजी आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या कामानंतर किल्ल्याकडे नागरिकांसह पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठीचा मुख्य मार्ग हा महामार्गावरील सगणाईदेवी मंदिरनाक्यावरून गावात जाणारा रस्ता आहे. तर, सगणाईदेवी मंदिराजवळूनच नव्याने ६० मीटरचा रस्ता हा पहिल्या टप्प्यात घोडबंदर येथील वीज उपकेंद्रापर्यंत बांधून पूर्ण होत आला आहे. हे दोन्ही रस्ते महामार्गाला मिळत असून दोन्ही रस्त्यांच्या जंक्शनमध्ये सुमारे सहा गुंठे इतकी जागा मोकळी राहणार आहे.
या त्रिकोणी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. हा पुतळा बसवण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. निविदा मागवल्या असता पुतळ्यासाठी दोन कोटी ९५ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव आला आहे.
सुशोभीकरणासाठी ६५ लाख ९३ हजारांचा खर्च होणार असून त्यासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. या एकूण सुधारित तीन कोटी ६१ लाखांच्या खर्चासाठी प्रशासकीय आणि आर्थिक मान्यतेसाठी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी प्रस्ताव महासभेसाठी दिलेला आहे.
जाणकारांची सल्लागार म्हणून नियुक्ती करा
मागील महासभा तहकूब झाल्याने ती सभा लागताच त्यात हा प्रस्ताव सर्व नगरसेवक एकमताने मंजूर करतील, असा विश्वास उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी व्यक्त केला. घोडबंदर किल्ल्याकडे जाणाºया मार्गाच्या प्रमुख जंक्शनवर शिवरायांचा पुतळा उभा राहणे मोठे अभिमानास्पद व आनंदाची गोष्ट आहे. सुमारे ३० फूट उंचीचा हा पुतळा असून त्यासाठी इतिहासातील जाणकारांची सल्लागार म्हणून नियुक्ती करा, अशी सूचना प्रशासनास केली असल्याचे वैती म्हणाले.