ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार सुसज्ज प्रयोगशाळा; राजेश टोपे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:55 AM2020-07-04T02:55:56+5:302020-07-04T02:56:15+5:30
भिवंडीतील कोरोना परिस्थितीचा आढावा
भिवंडी : कोरोनाच्या चाचणीसाठी नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याने इंदिरा गांधी रुग्णालय व जिल्ह्यातील एमएमआर क्षेत्रात पाच ठिकाणी मुंबईप्रमाणे सुसज्ज लॅब सुरु केल्या जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता अहवालासाठी मुंबईवर अवलंबून राहावे लागणार नाही. या लॅबमध्ये मोफत तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात १५ दिवसात ही प्रयोगशाळा सुरु होणार आहे. अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शहापूर येथे प्रयोगशाळा सुरु केल्या जातील असे त्यांनी सांगितले. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टोपे यांनी गुरुवारी भिवंडी महापालिकेस भेट देऊन कोरोना संदर्भातील आढावा घेतला. यावेळी शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यासाठी लागणारा निधीही मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती दिली. शहरातील एकमेव कोविड रुग्णालयाचा वाढता ताण लक्षात घेता या रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची लवकरच भरती केली जाणार आहे. इंदिरा गांधी कोविड रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असून २८ रुग्णवाहिकाही शहरासाठी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्ह्यात होणार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
भिवंडीकरांनी आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास घरात न थांबता त्वरित उपचारासाठी रुग्णालयात जावे, जेणेकरून नागरिकांवर वेळेत उपचार करून कोरोनावर मात करता येईल असे आवाहनही रोजेश टोपे यांनी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यात एक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयही लवकरच उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्ह्यातील बेडसाठी डॅशबोर्ड : एमएमआर रिजनमध्ये कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची रोजची अपडेट जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी डॅशबोर्ड तयार करून त्यावर माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश टोपे यांनी दिले. कोरोनाचे रुग्ण सापडल्यावर त्यासलंग्न असलेल्या रुग्णांची ट्रेसिंग करण्याच्या सुचना त्यांनी पालिका प्रशासनास दिल्या आहेत. अलगीकरण कक्ष वाढवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या परिसरातील महाविद्यालय, हॉटेल आदी सर्व आस्थापनांशी चर्चा करून त्या जागा ताब्यात घेण्यावर भर देण्यासही त्यांनी सांगितले.