मान्सूनचा सामना करण्यासाठी ठामपाची यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:25+5:302021-06-09T04:49:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदा अधिक प्रमाणात मान्सूनचा पाऊस होणार असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदा अधिक प्रमाणात मान्सूनचा पाऊस होणार असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मान्सूनमध्ये घडणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. यानुसार धोकादायक इमारतधारकांना नोटिसा बजावणे, भूस्खलन क्षेत्रातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना, एखाद्या वेळेस आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी सध्या मॉक ड्रिलच्या माध्यमातून ठाणे आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाचा कसून सराव सुरू आहे. तसेच साधनसामग्री आदींसह इतर व्यवस्था चोख ठेवण्याची तयारी पालिकेने केली आहे. यासाठी बोटी, लाइफ जाकीट आदींसह इतर साहित्यही उपलब्ध करून दिले आहेत.
पावसाळ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागदेखील सक्षम करण्यात आला आहे. येथे ऑन ड्यूूटी २४ अशा पद्धतीने कर्मचारी नेमले आहेत. याशिवाय आपतकालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी हॉटलाइन, टोल फ्री क्रमांक सज्ज ठेवले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धतीदेखील तयार केली आहे. त्यानुसार शोध व बचावकार्यासाठी बोट, जेसीबी, लाइफ जाकीट, लाइफ बॉइज आदी साहित्य घेण्यात आले आहे. तसेच १२ फायर इंजिन, पाच इमर्जन्सी टेंडर, आठ वॉटर टेंडर, तीन जम्बो वॉटर टेंडर, क्विक रिस्पॉन्स व्हेइकल आठ, जीप, टर्न लेबर लॅडर आदींसह इतर व्यवस्था अग्निशमन विभागाकडून सज्ज ठेवली आहेत. शहरात आजघडीला ४ हजार ५२२ इमारती धोकादायक आहेत. तर त्यातील ७३ इमारती या अतिधोकादायक आहेत. त्यानुसार अतिधोकादायक इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येत असून ३० हून अधिक इमारतींवर हातोडा टाकला आहे. तसेच पावसाळ्यात आपत्ती घडल्यास त्यासाठी १३ ठिकाणी रात्र निवाऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. शहरातील १४ सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने अशा भागांची पालिकेने यादी तयार केली असून त्याठिकाणी पावसाळ्यात जातीने लक्ष दिले जाणार आहे. तसेच १४ भूस्खलनाची ठिकाणे असल्याने त्याठिकाणच्या रहिवाशांनादेखील नोटिसा बजावलेल्या आहेत. पूर परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी भरती आणि आहोटीची यादीही प्रसिद्ध केली आहे. साथ रोगांचे नियोजन करण्याबरोबर, रस्ते दुरुस्ती नालेसफाईची कामेदेखील वेगाने सुरू आहेत. तसेच ३४ जणांची टीडीआरएफची टीमही पालिकेची सज्ज झालेली आहे. शहरात आजघडीला ५१८ धोकादायक स्थितीत वृक्ष असून त्यांच्या फांद्याची छाटणी करण्याचे कामही सुरू झाले आहे. एकूणच आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडेदेखील लाइफ जाकीट १५, लाइफ बॉय १५, रबरी बोट, प्रशिक्षित व सुटका गट ४, दोरखंड, आग विझविण्याचे यंत्र, आर.डी.एम. सी. जाकीट आदींसह इतर साहित्य सज्ज ठेवले आहे. तसेच एखाद्यावेळेस पावसाळ्यात मोठी आपत्ती झाली तर त्यावेळेसदेखील नागरिकांना तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे यासाठी महापालिकेच्या मालकीच्या १० व खाजगी मालकीच्या १६ बोट अशा एकूण २६ बोट सज्ज ठेवल्या आहेत. तर शहरात ६ ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणादेखील बसविली आहे.
फायर फायटर - १२
रेस्क्यू व्हॅन - ४
फायबर बोटी -२६
लाइफ जाकीट - १५
कटर - १२
अग्निशमन दल सज्ज
पावसाळ्याचा सामना करण्यासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व मनुष्यबळाला आता सराव दिला जात आहे. तसेच फायर इंजिन, इमर्जन्सी टेंडर, वॉटर टँकर, क्विक रिसपॉन्स वाहन, आदींसह इतर वाहनेदेखील सज्ज ठेवली आहेत.
पूरबाधित क्षेत्र
ठाण्यातील १४ ठिकाणे ही सखल भागात येत आहेत. यामध्ये वंदना, गडकरी चौक, चव्हाण चाळ, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, पंचामृत सोसायटी जवळ - घोडबंदर, विटावा रेल्वे पुलाखाली, दिवा गाव आदींसह इतर ठिकाणांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. दरवर्षी ही यादी तयार केली जात आहे. मागील वर्षी दिवा, वृंदावन आणि इतरच बहुतेक सखल भागात पाणी साचून शेकडो रहिवाशांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदादेखील पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत.
शहरातील धोकादायक इमारती, धोकादायक झाडे
शहरात आजघडीला चार हजार ५२२ धोकादायक इमारती असून त्यात ७३ इमारती या अतिधोकादायक आहेत. यातील ३० हून अधिक इमारतींवर पालिकेने कारवाई केली आहे. तसेच शहरात ५१८ धोकादायक वृक्ष असून त्याच्या फांद्या छाटण्याचे कामही सुरू केले आहे.
..............
मान्सूनचा सामना करण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. तसेच त्यांना मान्सूनपूर्व सरावही देण्यात आला आहे. मॉकड्रिलच्या माध्यमातून भविष्यात हानी घडलीच तर त्याचा सामना कसा करावा, याची तयारीदेखील केलेली आहे.
(गिरीश झळके, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपा)