ठाणे स्थानकातील एस्कलेटर बंद
By admin | Published: June 27, 2017 03:13 AM2017-06-27T03:13:14+5:302017-06-27T03:13:14+5:30
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व पाचवरील स्वयंचलित जिने दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व पाचवरील स्वयंचलित जिने दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त आलेल्या सुट्टीमुळे ठाणे स्थानकात एरव्हीपेक्षा जास्त गर्दी होती. लोकलमधून उतरल्यानंतर पादचारी पुलावर जाण्यासाठी प्रवाशांना जिने बंद असल्याचे कळताच त्यांची गैरसोय झाली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक कामांसाठी जिने बंद ठेवले होते. पण एकाच वेळी दोन्ही जिने बंद का, असा सवाल करत प्रवाशांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. काही प्रवासी बंद एस्कलेटरवरून जात असल्याने अखेरीस सोमवारी स्थानक प्रशासनाने गेट बंद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटर जळाल्याने आणि केबलला बाधा झाल्याने जिने बंद ठेवण्यात आले होते.