महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा ११ वा वर्धापन दिन सोहळा आणि शाहिरी लोककला महोत्सव संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:59 PM2018-03-12T16:59:43+5:302018-03-12T17:10:56+5:30
नृत्य, गाणी, पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांनी महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा ११ वा वर्धापन दिन सोहळा आणि शाहिरी लोककला महोत्सव संपन्न झाला.
ठाणे : महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा ११ वा वर्धापन दिन सोहळा आणि शाहिरी लोककला महोत्सव २०१८ रविवारी ठाणे (पू). येथील संत तुकाराम मैदानात पार पडला. या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांचे पोवाडे, लोकगीते, लावणी, लोकनृत्य, कोळीनृत्याद्वारे लोककलेचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.
महोत्सवाचे उद्घाटन किरण कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. सुरूवातीला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुसुदन सुगदरे यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष शाहीर रमेश नाखवा यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठी मुंबई विशेषांकचा उद्घाटन सोहळा पार पडला. प्रतिष्ठानचे सचिव विनोद नाखवा यांनी पुढील वर्षीचा हा कार्यक्रम परदेशात करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर उदय साटम लिखीत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमास सुरूवात झाली. देवा तुझ्या दारी आलो, मन गेलंय माहेरी, गाव जागवित आली या गाण्यांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. शाहीर शातांराम चव्हाण यांनी ‘या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हे गीत सादर केले. त्यानंतर मराठी मुंबई गौरव पुरस्काराने दिलीप पाटील व उद्योजक गणेश सुर्वे यांना सन्मानित करण्यात आले. शाहीर मधु खामकर यांनी पोवाडा सादर केला. त्यानंतर शेतकरी नृत्य, ठाकरी नृत्य सादर झाले. दर्शन साटम याने सैराट चित्रपटातील याड लागलं हे गाणे सादर केले. लावणी सम्राज्ञी हिने ‘बाई मी लाडाची गं’ ही लावणी सादर केली, यावेळी शिट्टया आणि टाळ््यांची तसेच, वन्समोअरची रसिकांमधून दाद मिळाली. लोकशाहीर दादा कोंडके यांना या कार्यक्रमात स्वरांची सुमरांजली वाहण्यात आली. त्यांची हिल पोरी हिला, मी तर भोळी अडाणी ठकू, ढगाला लागली कळ ही गाणी नृत्याद्वारे सादर झाली. शाहिर रमेश नाखवा यांनी बोला मल्हारीचा येळकोट हे गीत सादर केले. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे या उपस्थित झाल्या. विनोद नाखवा यांनी पुढील कार्यक्रम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी शिंदे म्हणाल्या की, लोककलेची गाणी स्फुर्ती देणारी आहे. महापालिकेच्या माध्यमातून असे कार्यक्रम होणे अपेक्षित आहेत. माझ्या कार्यकाळात असे कार्यक्रम होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शाहिर दत्ता ठुले यांनी आंबेचा गोंधळ सादर केला. निलेश जाधव यांनी संभाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.दरम्यान, नृत्यकलाकार सुरेखा काटकर, दुरदर्शनचे विनायक चासकर, प्रकाश भडगुजर, सर्जन डॉ. मिलिंद पाटील, डॉ. मंजिरी देव, जयवंत वाडकर, आशिष पवार, प्रभाकर मोरे, उदय साटम आदींना लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन महेंद्र कोंडे यांनी केले.