गणरायाची मंडपांऐवजी मंडळांच्या कार्यालयात स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:58 AM2020-08-20T00:58:45+5:302020-08-20T00:58:50+5:30
यंदाचा गणेशोत्सव रस्त्यावर मंडप टाकून साजरा न करता मंडळांच्या कार्यालयातच साजरा करण्याचे ठरविले आहे.
ठाणे : गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आल्याने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने तो साजरा करण्याचे ठरविले आहे. यात वर्तकनगरमधील दोन गणेशोत्सव मंडळांनी गर्दी होऊ नये म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव रस्त्यावर मंडप टाकून साजरा न करता मंडळांच्या कार्यालयातच साजरा करण्याचे ठरविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने साधेपणाने उत्सव साजरे करण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारच्या आवाहनाला शहरातील मंडळांनी प्रतिसाद देऊन आपापल्या स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. रस्त्यावर मंडप घातल्यास गर्दी होईल, त्यामुळे ती टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वर्तकनगर येथील जय भवानी युवक प्रतिष्ठान व महात्मा जोतिबा फुले रहिवासी मंडळ या मंडळांनी आपल्या मंडळाच्या कार्यालयांत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.
यंदा दोन्ही मंडळे शाडूमातीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. ‘जय भवानी’तर्फे दरवर्षी पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा ते दीड दिवसच साजरा करणार आहेत. हा निर्णय तीन महिन्यांपूर्वीच घेतल्याचे मंडळाचे संयोजक अजय मिश्रा यांनी सांगितले.
महात्मा जोतिबा फुले रहिवासी मंडळ हे ४० वर्षांपासून उत्सव साजरा करीत आहे. यंदा मंडळाच्या कार्यालयात श्रींची स्थापना करण्याचे त्यांनी ठरवले आहे.