कोट्यवधींचा गंडा घालून इस्टेट एजंट पसार; शोधण्यात पोलिसांचे अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 03:05 PM2019-01-04T15:05:46+5:302019-01-04T15:13:28+5:30
मीरारोडच्या झंकार कंपनी जवळील विनय नगरमध्ये असलेल्या शीतल कॉम्पलेक्समध्ये हार्दिक उर्फ राज मुक्तीलाल शेठ हा पत्नी व मुली सोबत भाड्याने रहायला आला.
मीरारोड - ३८ लोकांकडून भाड्याने घर मिळवून देण्यासाठी मोठी अनामत रक्कम घेऊन ती परस्पर लाटणारा मीरारोड मधील इस्टेट एजंट कुटुंबासह पसार झाला आहे. १ कोटी ८१ लाखांना गंडा घालणारा हा एजंट गुन्हा दाखल होऊन महिना व्हायला आला तरी तो काशिमीरा पोलीसांना तो हाती लागलेला नाही. काहींनी रोखीने सुध्दा पैसे दिले असुन पैसे दिल्याचा पुरावा नसल्याने ते तक्रारीसाठी पुढे आले नाहीत. त्यांची रक्कम धरल्यास ५ कोटींच्या घरात फसवणूक झाल्याचे सुत्रांनी सांगितले. पळून जाण्याआधी त्याने आत्महत्या करत असून पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी कुटुंबियांचे रक्षण करावे, असे चिठ्ठीत लिहले आहे.
मीरारोडच्या झंकार कंपनी जवळील विनय नगरमध्ये असलेल्या शीतल कॉम्पलेक्समध्ये हार्दिक उर्फ राज मुक्तीलाल शेठ हा पत्नी व मुली सोबत भाड्याने रहायला आला. येथे त्याने स्वत:ची सर्व कागदपत्रे तयार करुन राज इस्टेट नावाने इस्टेट एजन्सीचा धंदा सुरु केला. मोठी अनामत रक्कम घेऊन बिनभाड्याची सदनिका या परिसरात तो लोकांना घेऊन देत असे. स्वत:ला धार्मिक दाखवत असल्याने लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
मोठी अनामत रक्कम घेऊन तो भाडेरुला मात्र घरमालकास तसं सांगू नका असं बोलायचा. आणि घरमालकासोबत भाडेकरुचा भाडेकरार करायचा व स्वत: सोबत तो भाडेकरुचा मोठ्या अनामत रकमेचा वेगळा करारनामा करायचा. अशा प्रकारे त्याने अनेकांकडून काही कोटी रुपये गोळा केले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ४ लाखांपासून ३० लाखांपर्यंतची रक्कम त्याने उकळली आहे. अनेकांनी तर रोखीने व्यव्हार केल्याने पोलिसांकडून पुरावा मागितला जात असल्याने रोखीने पैसे देऊन फसलेले कोणी पुढे येण्यास तयार नाहीत.
वास्तविक नोव्हेंबर अखेरीसच हार्दिक हा कुटुंबासह रातोरात पसार झाला. त्याचे कार्यालय सुध्दा बंद आढळल्याने अनामत रकमेसाठी मोठी रक्कम दिलेली लोकं गोळा झाली. सुमारे ४० जणांनी काशिमीरा पोलीस ठाणे गाठले. पण पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल करुन न घेता केवळ अर्जच घेतला.
पळुन जाण्याआधी हार्दिकने दोन पानाची आत्महत्या करत असल्याची गुजराती भाषेत चिठ्ठी लिहली. सदर चिठ्ठीत त्याने वैभव शिंगारे यांनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे, तसेच आपल्या आत्महत्येस काही जणांची नांव लिहुन ते जबाबदार असल्याचे नमुद केले.
लोकांचा वाढता तगादा पाहता अखेर पियुष कांतीलाल दरजी यांनी दिलेल्या ५ डिसेंबर रोजीच्या तक्रार अर्जाच्या आधारे १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. आतापर्यंत दरजीसह एकुण ३८ जणांनी घर भाड्याने देण्यासाठी मोठी अनामत रक्कम घेऊन हार्दिकने आपली फसवणूक केल्याचे पोलिसांसमोर आले आहे. धनादेश आदी अधिकृत व्यवहाराने दिलेली फसवणुकीची रक्कम १ कोटी ८१ लाख रुपये इतकी आहे. पण रोखीने घेतलेली रक्कम सुध्दा मोठी आहे.
सुरतला त्याचे आई-वडिल रहात असुन त्यांच्याकडे चौकशी केली असता आपला मुलगा फसवणुकीचे धंदे करत असल्याने आपण त्याच्या संबंध ठेवला नसल्याचे त्यांनी पोलीसांना सांगीतल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याची एक कार मॅकडोनाल्ड जवळ फसलेल्या लोकांनीच पोलीसांना पकडून दिली. तर दुसरी कार सुध्दा शहरात दिसून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
घरमालकांना भाडे मिळेना, घर खाली करण्याचा तगादा
हार्दिकने मोठी अनामत रक्कम घेऊन अनेकांना लाखोंचा चुना लावला असतानाच आता घराचे भाडे मिळाले नाही म्हणुन घरमालकांनी सुध्दा भाड्यासाठी तगादा लावला आहे. अन्यथा घर रिकामे करा, असे सांगीतले जात आहे. त्यामुळे फसवणुक झालेले दुहेरी कात्रीत सापडले आहेत. आरोपी हार्दिक व त्याचे कुटुंब तसेच त्याने फसवणूक करुन गोळा केलेली काही कोटींची रक्कम पोलीसांना सापडत नसल्याबद्दल फसवणूक झालेले चिंतीत आहेत.