पुरोगामीत्वाच्या नावाखाली जातीयवाद
By admin | Published: May 30, 2017 05:41 AM2017-05-30T05:41:51+5:302017-05-30T05:41:51+5:30
महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर या दोन्ही नेत्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडला. पण, सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर या दोन्ही नेत्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडला. पण, सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर जाती निर्मूलनाचा विचार १९३४-३५ मध्ये मांडला आणि जाती निर्मूलनाचा आग्रह धरला. त्यावरून, सावरकरांच्या दूरदर्शी विचारांची साक्ष पटते, पण आज समाजात पुरोगामीत्वाच्या नावाखाली काही नेते जातीयवाद करत असल्याचे स्पष्ट मत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.
सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे वि.दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भंडारी बोलत होते. ते म्हणाले की, एक देश एक भाषा हा मुद्दा सावरकरांनी मांडला. या देशात शेकडो भाषा आणि हजारो बोलीभाषा आहेत. मात्र, देशाची संपर्काची भाषा एक असावी, असे सावरकरांचे मत होते. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले, पण त्या शब्दांची टिंगलटवाळी केली. त्यांच्या भाषाशुद्धीच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याचे तोटे आता आपल्याला जाणवू लागले असल्याचे भंडारी म्हणाले. सावरकरांनी सांगितलेला भाषाशुद्धीचा आग्रह म्हणजे वर्णवर्चस्वाचा आग्रह धरणे, असा अर्थ लावला जातो. हा पुळचटपणा आता सोडून देण्याची गरज आहे. ते क्रि याशील विचारवंत आणि कृतिशील साहित्यिक होते, याची साक्ष त्यांनी धरलेल्या भाषाशुद्धीच्या आग्रहामुळे पटते. म्हणूनच, त्यांनी धरलेला भाषाशुद्धीचा आग्रह योग्यच होता, असेही भंडारी म्हणाले. या वेळी पत्रकारिता क्षेत्रासाठी श्रीकांत बोजेवार, कार्यक्षम नगरसेवक नरेश म्हस्के, उद्योग क्षेत्रासाठी मेधा मेहंदळे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी महेश वर्दे, साहित्य क्षेत्रासाठी अशोक केळकर, सामाजिक क्षेत्रासाठी उज्ज्वला बागवडे यांना सावरकर स्मृती पुरस्काराने भंडारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. व्यासपीठावर भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर उपस्थित होते.