अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:09+5:302021-06-10T04:27:09+5:30
कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवार रात्रीपासून एकूण ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये, ...
कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवार रात्रीपासून एकूण ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी काही इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. कल्याण पूर्वेतील दोन अतिधोकादायक इमारतींतील २८ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले, तर डोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या आहेत. आठ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरू आहे. ‘अ’ प्रभागात टिटवाळा परिसरातील एक अतिधोकादायक इमारत रहिवासमुक्त केली आहे. जोरदार पावसामुळे मनपा हद्दीतील सखल भागांत पाणी साचल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मनपाने मनुष्यबळासह जेसीबीद्वारे पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्याचे काम केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पावसाचा आढावा घेतला. महापालिकेतील २०१ ठिकाणी असलेल्या ५५१ सीसीटीव्हीच्या साहाय्याने पाणी कुठे साचले आहे, याचे अवलोकन करून पाण्याचा निचरा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
------------------