११ दिवस झाले तरी ढिगाऱ्या खाली गाडल्या गेलेल्या पोकलेन चालकास बाहेर काढण्यात तज्ञ यंत्रणा अपयशी
By धीरज परब | Published: June 10, 2024 12:04 AM2024-06-10T00:04:09+5:302024-06-10T00:04:16+5:30
सूर्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत वसई खाडीतून भूमिगत जलवाहिनी मीरा भाईंदर मध्ये आणली जाणार आहे . एमएमआरडीएच्या माध्यमातून एल एन्ड टी कंपनी जलवाहिनी टाकण्यासाठी वरसावे नवीन पुलाच्या जवळ शाफ्टचे काम सुरु आहे .
मीरारोड - २९ मे च्या रात्री वरसावे खाडी पूल लगत सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिगत जलवाहिनी टाकण्याच्या कामा दरम्यान पोकलेन सह ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या चालकास ९ जून रोजी ११ दिवस झाले तरी त्याला बाहेर काढण्यात एनडीआरएफ , व्हीजीटीआय पासून एलअँडटी , एमएमआरडीए सारख्या तज्ञ यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत .
सूर्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत वसई खाडीतून भूमिगत जलवाहिनी मीरा भाईंदर मध्ये आणली जाणार आहे . एमएमआरडीएच्या माध्यमातून एल एन्ड टी कंपनी जलवाहिनी टाकण्यासाठी वरसावे नवीन पुलाच्या जवळ शाफ्टचे काम सुरु आहे . या ठिकाणी सुमारे २२ मीटर खोल खणायचे असून बुधवारी २९ मे रोजी सुमारे २० मीटर खोली पर्यंत पोकलेन ने खोदकाम सुरु असताना रात्री जमीन खचून एका बाजूचे काँक्रीट ब्लॉक मातीसह पोकलेन वर कोसळले . त्यात चालक राकेश कुमार यादव ( वय वर्ष ३२) हा ढिगाऱ्याखाली पोकलेन सह गाडला गेला आहे .
गुरुवार ३० मे रोजी एनडीआरएफचे पथक बचावकार्या साठी दाखल झाले . या शिवाय व्हीजेटीआयच्या तज्ञ लोकांसह एल एन्ड टी व एमएमआरडीए चे तज्ञ व वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल सुद्धा कार्यरत आहे . परंतु ९ जून झाली तरी ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या पोकलेन व चालक यादव ह्याला अजूनही बाहेर काढण्यात यश आलेले नाही .
मूळचे वसई खाडी पात्र असलेल्या या ठिकाणी खालून देखील पाणी येत असून माती देखील दलदलीची आहे . शाफ्टच्या तीन बाजूला असलेले अति वजनदार काँक्रीट ब्लॉक कोसळण्याची भीती असल्याने ते रोखून धरण्यासाठी लोखंडी बार लावले . तर खाली पडलेले एका बाजूचे मोठे व मजबूत काँक्रीट ब्लॉक ब्रेकरने तोडण्याचा प्रयत्न फसल्या नंतर डायमंड कटर यंत्र आणण्यात आले. परंतु काँक्रीट ब्लॉक चे तुकडे करायला खूपच वेळ लागत असल्याने शेवटी एकाबाजूने जमीन खोदकाम करून रॅम्प तयार केला गेला . नंतर पोकलेन ला काँक्रीट ब्रेकर लावून त्याने ब्लॉक तोडण्यास सुरवात केली . ५ ब्लॉक तोडून झाल्या नंतर त्याचा मलबा बाहेर काढून पोकलेन ने मातीचा ढीग उपसण्याचे काम सुरु आहे .
दुसरीकडे खालून पाणी येत असल्याने ते उपसा करण्यासाठी सक्शन पंप लावण्यात आले आहेत . त्यातच शनिवार मध्यरात्री पासून पाऊस सुरु झाल्याने शाफ्ट मध्ये पाणी भरू लागले . रविवारी सकाळ नंतर पावसाने उसंत घेतल्याने ढिगारा उपसण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात आले .
अजूनही गाडला गेलेला चालक व पोकलेन लागले नसून आणखी काही फूट खोल खोदकाम करणे बाकी आहे . आत अडकलेला चालक राकेश यादव ह्याच्या जिवंत असल्याची आशा जवळपास मावळली असली तरी त्याच्या कुटूंबियांना मात्र अजूनही तो परत येईल अशी आशा लागून आहे . राकेश याचे कुटुंबीय हे त्याला पाहण्यासाठी डोळे लावून बसले आहेत . तर ११ दिवस उलटल्याने खाली पाणी आणि दलदलीत तो काय अवस्थेत असेल याची कल्पना करवत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे .