जि.प.कडून वित्त प्रेषण कमी दिल्याने रखडले निवृत्ती वेतन; निवृत्तीधारकांमध्ये संताप
By सुरेश लोखंडे | Published: April 18, 2024 06:17 PM2024-04-18T18:17:13+5:302024-04-18T18:17:25+5:30
ठाणे जि प चे प्रशासन निवृत्त धारकांच्या प्रश्ना बाबत नकारात्मक असल्याने त्यामुळे निर्माण हाेणाऱ्या विविध समस्यांना निवृत्त धारकांना ताेंड द्यावे लागत असल्याची खंत जगे यांनी व्यक्त करून जिल्हा प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली
ठाणे : माहे मार्च पेड ईन एप्रिलच्या निवृत्ती वेतानासाठी शासनाचे ग्रामविकास विभाग कडून ३ एप्रिलचे आदेशान्वये तरतूद उपलब्ध करून देण्यांत आली आहे. परंतु १५ दिवस होऊनही कल्याण,अंबरनाथ व मुरबाड तालुक्यातील निवृत्ती धारक निवृत्त वेतानापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण गटास एक कोटी १३ लाखाचे वित्त प्रेषण आवश्यक असताना जि पच्या वित्त विभागाकडून फक्त १३ लाख अनुदान वितरित करण्यात आल्याने निवृत्ती वेतन होऊ शकले नाही, असा आराेप पेन्शन वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र जगे यांनी केला आहे. पण आता नव्याने कोषागारातून अनुदानाचे देयक पारीत करून काढावे लागेल ही प्रक्रिया होणेसाठी अजून १० दिवस जातील असे वाटते म्हणजे निवृत्त वेतन मिळण्यास एक महिन्याचा उशीर होणार असल्याचे वास्तव जगे यांनी स्पष्ट केले. तर मुरबाड गटातील निवृत्त वेतन देयके तयारच केली नसल्याने तेथेही निवृत्त वेतन अद्यापही प्रदान झालेले नाही, अंबरनाथ येथे ही हीच अवस्था असल्यामुळे या निवृत्तीधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे जि प चे प्रशासन निवृत्त धारकांच्या प्रश्ना बाबत नकारात्मक असल्याने त्यामुळे निर्माण हाेणाऱ्या विविध समस्यांना निवृत्त धारकांना ताेंड द्यावे लागत असल्याची खंत जगे यांनी व्यक्त करून जिल्हा प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली. निवृत्त वेतन वेळेत न झाल्यास निवृत्त धारक आंदोलन करण्याचे पवित्र्यात आहे व तशी नोटीस पेन्शनर असोसिएशन ने मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि प ठाणे याना दिली असल्याचे या संघटनेचे सचिव रामचंद्र मडके यांनी सांगितले.